Mom Dresses Son As Tukaram Mundhe Viral Video : सध्याच्या काळात प्रसिद्ध व्हायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे काही जण प्रसिद्ध होण्यासाठी, तर अनेक जण प्रसिद्धी मिळविण्यासाठी काम करतात. पण, आयएएस तुकाराम मुंढे यांच्यासारखी काही माणसे काम केल्यामुळे प्रसिद्ध होतात. म्हणून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव सध्या चर्चेत आहे. प्रत्येकाला हॉटेलमध्ये, प्रत्येक स्टॉलवर भेसळमुक्त पदार्थ खायला मिळू देत यासाठी कंपन्या, दुकानांवर कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे सध्या ते सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. तर याचनिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी चिमुकल्यांना देशासाठी बलिदान देणाऱ्या, तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पेहराव करून, त्यांच्याविषयी कौतुकाचे दोन शब्द सांगण्यासही प्रोत्साहन दिले जाते. तर, सोशल मीडियावर एका कुटुंबाने चक्क आयएएस तुकाराम मुंढे यांना प्रेरणास्थानी ठेवून, त्यांच्यासारखा हुबेहूब लूक चिमुकल्याचा केला आहे. चिमुकल्याचा अंगावर कडक इस्त्रीचे फॉर्मल कपडे, ओठांवर अगदी छोटीशी मिशी, गळ्यात आयडी, हातात काळ्या रंगाची एफडीएची इन्स्पेक्शन किट देऊन आई चिमुकल्याचा सराव घेताना दिसते आहे.

कुटुंबाने या फॅन्सी ड्रेस कार्यक्रमासाठी छोटासा आयडीदेखील बनवून घेतला आहे, ज्यामध्ये चिमुकल्याचा फोटो आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, असे नावदेखील लिहिले आहे. त्याच्या हातात एक कागद असतो, ज्यात स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता, स्वच्छतेची काळजी, एक्स्पायरी डेट, सुरक्षित अन्न या गोष्टींची यादी असते आणि प्रत्येक मुद्द्याच्या पुढे क्लिक/टिक करण्यासाठी बॉक्स असतात. चिमुकला स्वतःची ओळख तुकाराम मुंढे, अशी करून देतो आणि शेवट ‘जय हिंद’ या शब्दाने करतो. एकदा बघाच ज्युनियर तुकाराम मुंडे यांचा सुंदर व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @viransh_and_pravyaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी, “या मुलाच्या आई-वडिलांना मला धन्यवाद म्हणायचे आहेत. माझ्या मते, समाजाकडून मिळणारी ओळख आणि लोकप्रियता ही चांगल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरली पाहिजे. म्हणूनच मुंडेसरांसारख्या व्यक्तींचा सन्मान करणे आणि त्यांचे कौतुक करणे ही चांगली गोष्ट आहे,” “मी घाबरली, आता मी स्वयंपाक नाही बनवणार,” अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

चिमुकला शाळेत तुकाराम मुंढे बनून गेल्यामुळे काही जण, “सगळ्यांचा टिफिन आधी आम्ही taste करणार… म्हणजेच test करणार”, “शाब्बास”, “ज्युनियर तुकाराम मुंडे टिफिन तपासणीसाठी आले आहेत. सगळ्यांनी आपापले डबे उघडा” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत