उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या दोन फोटोंची चांगलीच चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथांच्या खांद्यावर हात ठेऊन बोलत बोलत चालताना दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशात पुढील वर्षारंभी विधानसभेची निवडणूक होणार असून योगी आदित्यनाथ सरकारकडून विविध विकासकामांचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. विकासाच्या मार्गाने नवा देश घडवण्याच्या संकल्प आम्ही केलाय अशा अर्थाची कॅप्शन योगी यांनी या फोटोला दिलीय.
नक्की वाचा >> “साहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत”; मोदी-योगींच्या ‘त्या’ फोटोवरुन टोला
“हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊँचा जाना है, एक भारत नया बनाना है,” या कॅप्शनसहीत योगी यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
मात्र आता याच फोटोंवरुन राज्यामधील भाजपाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनी ट्विटरवरुन टोला लगावला आहे. “जगाला दाखवण्यासाठी राजकारणामध्ये तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. जसे की एखाद्याच्या खांद्यावर हात ठेऊन काही पावलं एकत्र चालणं,” असं म्हणत अखिलेश यांनी या फोटोवर योगींवर निशाणा साधलाय.
तर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदुराय यांनी ट्विटवरुन, “समाजवादी पक्षाने लखनऊमध्ये तसेच उत्तर प्रदेशमध्ये केलेलं काम पाहिल्यावर पंतप्रधान मोदीजी मुख्यमंत्र्यांना, ‘तुमसे ना हो पाऐगा, आएगा तो अखिलेश ही,’ असं सांगत असतील, असं ट्विट केलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या हम तो फकीर आदमी हैं भाई, झोला उठा के चल दिये या वक्तव्याची आठवण करुन देत काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी या फोटोवर कमेंट केलीय. योगी आता स्वत: जातात की त्यांना लाथ मारुन हाकललं जातं हे येणारा काळच सांगेल, असं राजपूत म्हणालेत.