लाईव्ह कार्यक्रमादरम्यान मेक्सिकोतल्या एका चॅनलच्या अँकरने चित्रीकरणासाठी समोर आलेल्या ड्रोनला जोरात लाथ मारली. लाथेमुळे सैरभैर होऊन ड्रोन कार्यक्रमातील सहभागी मॉडेलच्या चेहऱ्याला लागला.

२६ ऑक्टोबरला मेक्सिकन व्हरायटी प्रोग्रॅम ईएस शो दरम्यान हा प्रकार घडला. अर्नेस्टो चावाना बोलत असताना एक छोटा ड्रोन त्याच्यासमोर आला. अचानक आलेल्या ड्रोनमुळे अर्नेस्टो चिडला आणि त्याने रागाच्या भरात त्याला लाथ मारली. लाथेमुळे जमिनीलगत असलेला तो ड्रोन हवेत उडाला आणि जवळच उभ्या असलेल्या मॉडेलच्या चेहऱ्याला लागला. कोलंबियाची मॉडेल आणि नृत्यांगना इसाबेला रोजसच्या चेहऱ्याला हा ड्रोन लागला. तिला उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेण्यात आलं.

ड्रोन लागल्यामुळे रोजस खाली वाकली. वेदनेमुळे डोळ्यात पाणी दाटलेल्या रोजसला प्रॉडक्शन टीमने उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेलं. अँकर अर्नेस्टोने या सगळ्या प्रकारानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवला.

उपचारानंतर रोजस सेटवर परतली. अर्नेस्टोने तिच्यासकट सगळ्यांची माफी मागितली. झाल्या प्रकाराबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. या संपूर्ण प्रकाराची मी जबाबदारी घेतो. मी असं वागायला नको होतं. रागाच्या भरात माझ्या हातून हे कृत्य घडलं. माझ्यामुळे रोजससह सेटवरच्या सगळ्यांना त्रास झाला. त्याबद्दल मी माफी मागतो.