पुण्यात मांजर दुसऱ्या महिलेच्या घरात गेली म्हणून दोन महिलांचा वाद झाला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोघींची मारामारी झाली. त्यानंतर या दोघी महिला पोलीस ठाण्यात गेल्या. पोलिसांनी या दोघींचं म्हणणं ऐकून तक्रार नोंदवली आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. त्याच पुण्यात चक्क मांजर शेजारच्या महिलेच्या घरात गेली म्हणून वाद झाला आहे. रेश्मा आणि उषा या दोन महिलांमध्ये वाद झाला आहे. या दोन महिला एकमेकींच्या सख्ख्या शेजारी आहेत.
नेमकं काय घडलं प्रकरण?
पुण्यातल्या खडकी भागात एका सोसायटीत उषा वाघमारे आणि रेश्मा शेख या शेजारी शेजारी राहतात. रेश्मा यांच्याकडे एक मांजर आहे. ती शेजारी उषा यांच्या घरात गेली. उषा यांच्या घरात गेलेली मांजर रेश्मा यांनी आपल्या घरात परत आणली. रेश्माने मांजरीला शिव्या दिल्या आणि कुणाच्या घरात जायचं समजत नाही का? असं बोलली ते उषा यांनी ऐकलं आणि यावरूनच भांडण सुरु झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की उषा आणि रेश्मा यांच्यात हाणामारी झाली. हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेत दोन्ही महिलांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. झी चोवीस तासने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मांजर पाळण्याची आवड अनेकांना असते. मांजरीसाठी अनेकजण हौसेने ड्रेस शिवतात. त्यांचे रिल्स काढतात. त्यांच्यासोबत फोटो काढतात. एवढंच काय त्यांचे वाढदिवसही साजरे करतात. सोशल मीडियावर तर आपल्याला मांजर आवडणाऱ्यांची पेजेस, कम्युनिटीजही पाहण्यास मिळतात. कुत्रा आणि मांजर हे दोन प्राणी सर्वाधिक जास्त प्रमाणात पाळले जातात. अशात पाळीव मांजर दुसऱ्या महिलेच्या घरात गेली म्हणून दोन महिला शेजाऱ्यांमध्ये आधी भांडण आणि मग हाणामारी घडल्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.