प्रेमासाठी काय पण, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल किंवा वाचलं असेल, मात्र काही लोक प्रत्यक्षात हे वाक्य खऱ्या अर्थाने जगतात. एखाद्याच्या प्रेमात ते इतके वेडे होतात की, त्यांना प्रेमासमोर पैसा, प्रतिष्ठा महत्त्वाची नसते; तर प्रेम करणारी व्यक्ती महत्त्वाची असते. पण, एखाद्याला कधी कोणावर प्रेम जडेल हे काही सांगता येत नाही. असे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. याचाच प्रत्यय आला तो बिहारच्या गोपालगंजमध्ये. इथे एका मामीचा आपल्या भाचीवर जीव जडला, यानंतर मामीने पतीला सोडून पळून जात भाचीबरोबर लग्न केले. यानंतर दोघींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घरच्यांना लग्न केल्याची माहिती दिली.

विशेष म्हणजे मामी आणि भाचीत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. यानंतर तिने कसलाही विचार न करता त्यांनी दुर्गा भवानी मंदिरात लग्न केले.

ही घटना कुचायकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा गावात घडली आहे. या गावातील मामी आणि भाचीने लग्न करण्यापूर्वी नातेवाईकांनाही कसलीही कल्पना दिली नाही. दोघींनी थेट मंदिर गाठून सर्व लग्नविधी पार पाडल्या, एकमेकांच्या गळ्यात हार घातला, यानंतर भाचीने पत्नीरूप मामीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि सप्तपदी घेऊन एकमेकींना सातजन्म एकमेकींबरोबर राहण्याचे वचन दिले. यानंतर सोशल मीडियावर सर्वांना दोघींनी लग्न केल्याची माहिती दिली. मामी आणि भाचीच्या या अनोख्या लग्नाविषयी आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

दोघींनी व्हिडीओमध्ये म्हटले की, आम्ही आमच्या इच्छेनुसार लग्न करून एकत्र राहणार आहोत. दरम्यान, भाची शोभाच्या प्रेमात बुडालेली मामी सुमन म्हणाली की, शोभा खूप सुंदर दिसते. मला भीती होती की, तिचं दुसरीकडे लग्न झाले तर ती मला सोडून जाईल. फक्त या भीतीपोटी आम्ही दोघींनी सर्व सोडून मंदिरात लग्न केले.