शारजामध्ये राहणारे भारतीय उद्योजक डॉ. सोहन रॉय यांनी एक अनोखा निर्णय घेतला असून आपल्या एरियस ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहिणी म्हणून आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या घराची देखभाल करणाऱ्या महिलांना पगार देण्याचा निर्णय निर्णय रॉय यांनी घेतलाय. करोना साथीच्या कालावधीमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कंपनीसंदर्भात आणि आपल्या कामाबद्दल जो जिव्हाळा दाखवला आहे त्यामुळे रॉय प्रचंड प्रभावित झालेत. त्यामुळेच त्यांनी कर्मचाऱ्यांचं अनोख्या पद्धतीने कौतुक करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यामागे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं एक निरिक्षण कारणीभूत आहे.

माहिती गोळा करण्याचं काम सुरु

सध्या रॉय यांच्या कंपनीमधील व्यवस्थापनाकडून कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींची माहिती गोळा केली जात आहे. या माहिलांच्या पतीने किती वर्ष कंपनीमध्ये काम केलं आहे त्यानुसार या महिलांचा पगार निश्चित केला जाणार आहे. ही योजना कंपनी लवकरच अधिकृतरित्या लागू करणार असल्याचा वृत्त खलीज टाइम्सने दिलं आहे.

कोणालाही कामावरुन काढलं नाही, ना पगारकपात केली

मूळचे केरळचे असणारे एरियस ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी रॉय यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या कमावर खूपच खूश आहोत असं सांगितलं. सन २०२० मध्ये कठीण काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे ते पाहता आता त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना देण्याची वेळ आली आहे, असं रॉय सांगतात. विशेष म्हणजे एकीकडे करोनाचे कारण देत जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात होत असतानाच रॉय यांनी आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं नाही. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगारही कापला नाही.

कर्मचाऱ्यांच्या गृहिणींना पगार देण्याची कल्पना कुठून आली?

सन २०१२ मध्ये केरळच्या माहिला आणि बालविकास मंत्री कृषा तीरथ यांनी एक प्रस्ताव मांडला होता. यामध्ये त्यांनी गृहिणींना सामाजिक दृष्टीकोनामधून आणखीन सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मागील महिन्यामध्येही भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एका भरपाईच्या सुनावणीच्या प्रकरणामध्ये घरात काम करणाऱ्या गृहिणी महिलांचं काम हे ऑफिसला जाऊन काम करणाऱ्या पतीच्या कामापेक्षा कमी नसतं असं म्हटलं होतं. याचसंदर्भातील वृत्त वाचून रॉय यांच्या डोक्यात यासंदर्भात विचारचक्र सुरु झालं. करोना काळामध्येही कंपनीची साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहचारिणींचा यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सन्मान करता येणार नाही असं वाटल्याने रॉय यांनी ही योजना लागू करण्याचा निर्णय़ घेतला.

पेन्शन आणि शिष्यवृत्ती

रॉय यांच्या कंपनीमध्ये तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आई-वडीलांना पेन्शनची सेवाही देते. त्याचप्रमाणे कंपनी कर्मचाऱ्यांच्या मुलांना विशेष शिष्यवृत्तीही देते.