बहुचर्चित कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३चे कारशेड आरे वसाहतीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिल्यांनतर उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेत आरेमधील कारशेडला विरोध असेल असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. यावरुन आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. यावेळेस उद्धव ठाकरेंनी आरेमधील झाडं मेट्रोसाठी तोडली असतील तरी तिथे बिबटे आहेत असा उल्लेख केला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी उल्लेख केल्याप्रमाणे मागील काही दिवसांमध्ये अनेकदा या ठिकाणी बिबटे आढळून आले आहेत. त्यापैकी एका प्रसंगी तर आरेमधील म्हशींच्या गोठ्यातच बिबट्या शिरल्याचा व्हिडीओ समोर आला होता. उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्याचं समर्थन करणारा हा व्हिडीओ आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करताना, “माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसेल असं करु नका,” असं भावनिक आवाहन केलं. “हात जोडून विनंती आहे, माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मी मुंबईकरांच्यावतीने सांगतोय कारशेसाठी आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहचवू नका. तिकडे वन्यजीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे मला फार दु:ख झाले,” असंही उद्धव म्हणाले. “आता सरकार वर-खाली (केंद्रात आणि राज्यामध्ये) तुमचच आहे. कांजुरचा प्रस्ताव दिला होता, ही जमीन मुंबईकरांची आहे. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका,” असं आवाहन उद्धव यांनी केलंय.

पुढे बोलताना उद्धव यांनी आरेमधील बिबट्यांचा उल्लेख केला. “आरेमधील झाडं कापली म्हणून वन्यजीवन नष्ट झालेलं नाही. बिबट्या आहे, त्याचा पुरावाही फोटोत आहे,” असं उद्धव म्हणाले.

उद्धव यांनी बिबट्यांसंदर्भात केलेल्या या दाव्याचं समर्थन करणारा प्रसंग काही दिवसांपूर्वी आरेतील एका म्हशींच्या गोठ्यात घडला. रात्रीच्यावेळेस एक बिबट्या या गोठ्यामध्ये शिरला आणि बराचवेळ म्हशींकडे पाहत बसला होता. हा सारा प्रसंग कॅमेरात कैद झाला आणि तो चांगलाच व्हायरल ही झाला होता. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…

राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे.