ChatGPT Lost Footwear Ujjain Video : उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनसाठी गेलेल्या एका तरुणाला असा काही अनुभव आला की, ज्याची त्यानं कधी कल्पनाही केली नसेल. मंदिराबाहेर चपला आणि बुटांचा इतका मोठा खच पडला होता की, त्यातून त्याला स्वतःच्या चपला ओळखणेही कठीण झाले. अखेरीस, त्याने कोणा व्यक्तीकडे मदत मागण्याऐवजी चक्क चॅटजीपीटी (ChatGPT)ची मदत घेतली.
त्या तरुणाचे नाव शुभांग बोरकर असे आहे, जो गोव्याहून उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेऊन तो मंदिराबाहेर आला, त्यावेळी तिथे भाविकांच्या चपला आणि बुटांचा प्रचंड खच पडला होता. एवढ्या मोठ्या चपलांच्या ढिगाऱ्यात स्वत:ची चप्पल ओळखणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे कोणत्याही माणसाची मदत घेण्याऐवजी त्यांनी थेट ChatGPT चा वापर करण्याचे ठरवले.
शुभांग यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंदिराबाहेर शेकडो चपलांचा ढीग लागला होता. अशा परिस्थितीत स्वतःची चप्पल शोधणे कठीण होते. शुभांग यांनी प्रथम चपलांच्या रॅकचा एक व्हिडीओ आणि त्यासह स्वतःच्या चपलेचा एक स्वतंत्र फोटो ChatGPT वर अपलोड केला, जेणेकरून AI ला चप्पल ओळखणे सोपे जाईल.
ChatGPT ने कशी केली मदत?
शुभांग यांनी ChatGPT ला सांगितले की, ते महाकाल मंदिराच्या चप्पल स्टँडजवळ उभे आहेत आणि त्यांची चप्पल हरवली आहे. त्यानंतर त्यांनी रॅकचे वेगवेगळे फोटो AI ला पाठविण्यास सुरुवात केली. ChatGPT ने प्रत्येक फोटोचे बारकाईने निरीक्षण करून, त्या चपलेशी जुळणारी जोडी शोधण्यास सुरुवात केली.
काही फोटो तपासल्यानंतर AI ने एका विशिष्ट जागेकडे निर्देश केला. रॅकच्या उजव्या बाजूला, मध्य भागात खालच्या बाजूस चपलांची एक जोडी दिसत असून, ती त्यांच्या चपलांसारखीच असल्याचे ChatGPT ने स्पष्ट केले. शुभांग यांनी AI ने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, तिथे खरोखरच त्यांच्या चपलांची जोडी त्यांना दिसली. AI ने केवळ अंदाज न बांधता, अचूक लोकेशन शोधून दिले होते. या यशस्वी प्रयोगानंतर शुभांग यांनी AI चे आभार मानत ‘आपली छान टीम जमली’, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. रोजच्या आयुष्यात AI चा असाही वापर होऊ शकतो, यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. एका युजरने लिहिले, “ChatGPT चा असा अनोखा वापर पहिल्यांदाच पाहायला मिळाला.” तर दुसऱ्या युजरने उपरोधाने म्हटले, “मी जर तिथे असतो, तर जी सर्वांत छान चप्पल दिसली असती, तीच घालून निघून गेलो असतो.”
