आजकालची लहान मुलं मोबाईल आणि लॅपटॉप सारखी उपकरणं अगदी उत्तमरित्या हातळतात, महत्वाची बाब म्हणजे त्यांना ती उपकरणं कशी वापरावी हे शिकवावं लागत नाही. कारण ते मोठ्या लोकांकडे पाहून आपोआप शिकतात. शिवाय आपण जर त्यांना आपलं काम सुरु असताना मोबाईल किंवा लॅपटॉप द्यायला नकार दिला तर ते नाराज होतात आणि रडायला सुरुवात करतात. पण सध्या एका लहान मुलीला तिच्या मावशीने लॅपटॉप द्यायला नकार दिला म्हणून तिने चक्क स्वतःचा लॅपटॉप बनवला आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकजण या चिमुकलीच्या जुगाडाचं आणि बुद्धीचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.
ही घटना नेहा नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये कार्डबोर्डवरून बनवलेल्या लॅपटॉपचा फोटो पोस्ट केला आहे. नेहाने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझ्या भाचीने मला लॅपटॉप मागितला, पण मी तिला लॅपटॉप द्यायला नकार दिला म्हणून तिने तीन तासात घालवून स्वत: चा लॅपटॉप बनवला.” फोटोमध्ये कार्डबोर्ड कापलेलं दिसत आहे. जे लॅपटॉपच्या आकाराचे बनवले असून त्यावर स्केच पेन वापरून कीबोर्ड तयार केल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे खऱ्या लॅपटॉपची बटने ज्याप्रमाणे असतात तशीच या मुलीने तिच्या कार्डबोर्डच्या लॅपटॉपसाठी तयार केल्याचंही फोटोत दिसत आहे.




नेटकऱ्यांनी केलं मुलीचं कौतुक –
या मुलीने स्वत: बनवलेल्या लॅपटॉपमध्ये ‘गेम्स’, ‘झूम’, ‘लाइक’, ‘राइट’ आणि ‘सिलेक्ट’ यांसारखी अनेक बटणं बनवण्यात आली आहेत. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जी आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. तर हजारो लोकांनी लाईक केली आहे. नाटकऱ्यांनी या लहान मुलीच्या बुद्धीचे आणि तिच्या भन्नाट जुगाडाचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे, “हा लॅपटॉप सर्वोत्तम आहे, त्यात सतत विंडोज अपडेट्स नसतील.” दुसर्याने लिहिलं, या लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये बरेच पर्याय आहेत आणि ते तुमच्या लॅपटॉपपेक्षा खूपच स्वस्त आणि चांगले काम करणारे असतील.” तर बहुतांशी नेटकऱ्यांनी हा लॅपटॉप खुप सुंदर असल्याचं म्हटलं आहे.