रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं तुम्ही पाहिली असतील. प्रत्येक शहरात दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन होत असतात. काही आंदोलन कधी सुरू होतात आणि कधी संपतात, याचा पत्ताच लागत नाही. पण सध्या एका आंदोलन सोशल मीडियावरच बरंच हिट ठरलंय. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी चक्क खड्ड्यांमधूनच कॅटवॉक करत अनोखं आंदोलन केलंय. हे आंदोलन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

मध्य प्रदेशच्या भोपाळमधील होशंगाबाद रोडजवळील परिसरातील रहिवाशांनी परिसरातील खड्डेमय रस्त्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखं आंदोलन केलं. यासाठी दानिश नगरच्या महिलांनी दुर्दशा झालेल्या रस्त्यावर मॉक आउटडोअर फॅशन शो आयोजित केला. तसंच या रस्त्यावरील खड्ड्यांमधून कॅटवॉक करत आंदोलन केलं. यावेळी महिलांनी सुंदर साड्या परिधान करत पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमधून कॅटवॉक केलं. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता दुरुस्तीच्या मागण्या केल्या.

आणखी वाचा : मच्छिमाराला सापडला २० लाखांचा निळा झिंगा; म्हणाला “लाखात एक, या झिंग्याला मी….”

चिखल आणि खड्डे असलेल्या रस्त्यावर कॅटवॉक करताना महिलांनी कॉलनी परिसर महापालिकेच्या ताब्यात द्यावा, अन्यथा सर्व रहिवासी मालमत्ता कर भरणे बंद करतील अशी मागणीही केली.

दानिश नगरच्या रहिवाशांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, त्यांनी सर्व स्तरांवर रस्त्यांच्या खराब अवस्थेबद्दल तक्रारी केल्या आहेत. परंतु समस्या अद्याप सुटल्या नाहीत. “रस्त्यांवर प्रचंड खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. तरीही रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. आम्ही कशासाठी कर भरत आहोत?” असं एका रहिवाशाने सवाल केला.

आणखी वाचा : पाण्यात उडी घेत महाकाय मगरीची कूल एन्ट्री; पहा मजेशीर व्हिडीओ

या अनोख्या आंदोलनाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. तसंच हे आंदोलन चर्चेचा विषय ठरलाय.