UP Man Jumps Into Dam For Reel Both Legs Fractured: अलिकडे मनोरंजनासाठी शॉर्ट व्हिडीओ किंवा रील बनवून लाईक्स आणि शेअर मिळवण्याची अनेकांची धडपड सुरु असल्याचे दिसून येते. यात बऱ्याचवेळा जीवघेणे प्रकार अथवा स्टंट केले जातात. काही वेळेस असे जीवघेणे स्टंट अंगलट आल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना समोर आली आहे. रीलसाठी ३० फूटावरुन धरणात उडी मारणे तरुणाच्या अंगलट आहे. तरुणाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
दोन्ही पाय फ्रॅक्चर
समोर आलेल्या माहितीनुसार, ३० ते ३२ वर्षीय या तरुणाने रीलसाठी ३० फूटावरून धरणात उडी मारली. झाशी येथील पहूज धरणात या तरुणाने उडी मारली, पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. रविवारी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पुष्पेंद्र असे या तरुणाचे नाव आहे.
रीलसाठी ३० फूटावरुन मारली उडी
पुष्पेंद्र मित्रांबरोबर रील तयार करण्यासाठी पहूज धरणावर पोहोचला होता. थरारक स्टंट कॅमेऱ्यात कैद करुन त्याची रील करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यासाठी पुष्पेंद्रने धरणाच्या भिंतीवर उभारण्यात आलेल्या रेलिंगवर उभा राहून ३० फूटावरुन खाली धरणात उडी मारली. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दुखापत एवढी गंभीर होती की पुष्पेंद्रला पाण्यातूनही बाहेर पडणे कठीण झाले. पायांची हालचाल होईना त्यामुळे पुष्पेंद्र बुडायला लागला दरम्यान, हातांची हालचाल करुन तो पाण्यावर तरंगत राहू शकला.
पायावर शस्त्रक्रिया
यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पुष्पेंद्रला बाहेर काढले. घडल्या प्रकारानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमी पुष्पेंद्रला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्याचे दोन्ही फ्रॅक्चर झाल्याचे ‘एक्स रे’मधून दिसून आले. समोर आलेल्या माहितीनुसार सध्या एका पायात लोखंडी रॉड टाकून शस्त्रक्रिया करण्यात आलीय तर, दुसऱ्या पायवरील शस्त्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार त्याच्या मित्रांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. पुष्पेंद्र उडी घेण्यापूर्वी त्याचा एक मित्र गंमतीने “देव तुझ्या आत्म्यास शांती देवो,” असे म्हणताना फुटेजमध्ये दिसत आहे.
