scorecardresearch

कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस

उत्तर प्रदेशमधील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय

कहर… गप्पा मारता मारता नर्सने पाच मिनिटांमध्ये एकाच व्यक्तीला दिले करोना लसीचे दोन डोस
करोना लसींच्या दोन डोसमधील अंतर किती असावं यासंदर्भात आपल्याला माहिती नव्हती असं या व्यक्तीने म्हटलंय. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : रॉयटर्सवरुन साभार)

देशामधील अनेक राज्यांमध्ये करोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना करोना लसीचा दुसऱ्या डोससाठी स्लॉट मिळत नाहीय. असं असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडलीय. या घटनेच्या माध्यमातून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. येथे एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना रावरपुर परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे. या घटनेनंतर लसीकरण केंद्रामध्ये एकच गोंधळ उडाला.

समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आले. या व्यक्तीने ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप केलाय. लसीकरणासाठी मी गेलो तेव्हा लस देणाऱ्या नर्स एकमेकींशी गप्पा मारत होत्या. त्या गप्पांमध्ये इतक्या व्यस्त झालेल्या की त्यांनी मला पाच मिनिटांमध्ये लसीचे दोन डोस दिले असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. लसींच्या दोन डोसमध्ये नक्की किती अंतर असावं यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नव्हती असा दावाही या व्यक्तीने केलाय.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

लस घेऊन घरी आल्यानंतर आपल्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आपण करोना लसीकरण केंद्रावर घडलेला प्रकार कुटुंबातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर त्याला दोन डोस एकाच वेळी घ्यायचे नव्हते हे समजलं. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या व्यक्तीने मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि यासंदर्भात अधिकृतपणे तक्रार नोंदवली.

नक्की वाचा >> करोना हे सरकारचं षडयंत्र, रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे लोक मास्क लावतात : महंत नरसिंहानंद

मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या व्यक्तीला आप्तकालीन वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी नक्की काय घडलं, यासाठी जबाबदार कोण आहे यासंदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच घडलेल्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याने काही नुकसान होत नाही, असं स्पष्ट केलं आहे. लसींच्या दोन डोसमध्ये किमान चार आठवड्यांचं अंतर असणं बंधनकारक आहे.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

लस नको म्हणून नदीत उड्या मारण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडलाय

लसीकरणासंदर्भातील असा अजब गोंधळ होण्याची ही उत्तर प्रदेशमधील काही पहिलीच घटना नाहीय. मे महिन्यामध्ये लस घ्यायची नाही म्हणून बाराबंकीजवळील रामनगरमधील सिसौंडा गावामध्ये गावकऱ्यांनी लसीकरण पथकाला पाहून नदीत उड्या मारल्या होत्या. गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच लस घ्यायची नसल्याने काही गावकऱ्यांनी चक्क शरयू नदीमध्ये उड्या मारल्या.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

समोर घडणारा प्रकार पाहून लसीकरणासाठी आलेली टीमही थक्क झाली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर या ठिकाणी रामनगरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) पोहचले. त्यांनी लसीकरणाला विरोध करुन नदीमध्ये उड्या मारणाऱ्या लोकांना लसीचा फायदा आणि ती घेणं का महत्वाचं आहे हे समजवून सांगितलं. मात्र त्यानंतरही गावातील केवळ १४ जणांनीच लस घेतली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2021 at 12:21 IST

संबंधित बातम्या