Thar Shocing Viral Video : ट्रॅफिक जामला कंटाळून लोक अनेकदा शॉर्टकट मार्ग शोधत असतात, यात बाईकस्वारांसाठी फुटपाथ तर आता हक्काचाच शॉ़र्टकट झाला आहे. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल ट्रॅफिकच्या वेळी फुटपाथवर माणसांपेक्षा बाईक्सचीच गर्दी असते. अशाचप्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका ड्रायव्हरने असा मार्ग निवडला की सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. या तरुणाने आपली महिंद्रा थार थेट फुटपाथवर चढवली. एवढेच नाही तर शेजारी बसलेल्या आईला याचे फायदे सांगू लागला. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आईला सांगितले थारचे फायदे
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता, प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर ड्रायव्हरने संयम न बाळगता आपली SUV कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उंच फुटपाथवर धावली. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याने स्वतःच्या मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्ड केला, याचदरम्यान कॅमेरा आईकडे फिरवत अभिमानाने म्हणाला, “थार असण्याचा हाच फायदा आहे, आपण ती कुठेही चढवू शकतो.”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मुलाच्या या बेकायदेशीर कृत्यावर आई रागावण्याऐवजी हसताना दिसली. थोडे पुढे गेल्यावर त्याने गाडी पुन्हा खाली रस्त्यावर आणली आणि वाटेत एका बाईकस्वाराला माजात पुढे जाण्याचा इशाराही केला.
सोशल मीडियावर लोकांचा संताप
@SaffronChargers या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. एका युझरने टोला लगावत लिहिले की, “अशा गाड्या विकण्यापूर्वी ग्राहकाची मानसिक चाचणी सक्तीची केली पाहिजे.” तर दुसऱ्या युझरने आठवण करून दिली की, “मोठी गाडी असणे म्हणजे रस्ता किंवा फुटपाथवरील लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा परवाना मिळत नाही.” अनेक लोकांनी आईच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित केले आणि म्हटले की, “आमच्या आईने असे पाहिले असते, तर ओरडण्याबरोबरच सणसणीत कानशिलात लगावली असती.”
