Jantar Mantar NEET Protest Police lathi Charge Students Emotional Video : नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाविरोधात सध्या दिल्लीतील जंतरमंतरवर देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला. या लाठीचार्जनंतर आंदोलनाचा भडका उडाला असून यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आंदोलनादरम्यानचे हे भीषण दृश्य पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. याच आंदोलनात सहभागी झालेल्या आणि UPSC ची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तिने मांडलेली व्यथा पाहून कोणाचेही मन हेलावेल.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्या विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाले. यावेळी ती म्हणाली, “पोलिसांना पाहून मी स्वतः UPSC ची तयारी करत होते, पण आता मन करत नाही. पोलीस असे असतात का? पोलीस आपल्या समस्या समजून घेण्यासाठी असतात की कशासाठी असतात? मी अजून पोलीस झाले नाही, पण माझी घुसमट होतेय. चुकून मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करून पोलीस झाले, तर मी कशी यांच्यात राहू शकेन?” अशी भावनिक प्रतिक्रिया देत ती धाय मोकलून रडू लागली.

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. काहींना तर इतक्या अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली की, ते दृश्य पाहून मन विषण्ण होते.

या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर कडक शब्दांत टीका केली जात आहे. “स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची हीच शोकांतिका आहे,” अशा कमेंट्स करत लाखो युजर्सनी या विद्यार्थिनीला पाठिंबा दर्शवला आहे.