UPSC Aspirant Viral Post: UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक तरुण आपली नोकरी, नाती, आराम आणि आयुष्यातील अनेक वर्षे पणाला लावतात. मात्र, वारंवार अपयश आल्यानंतर या प्रवासाचा मानसिक परिणाम किती खोलवर होऊ शकतो, याची जाणीव करून देणारी एका २६ वर्षीय UPSC उमेदवाराची कहाणी सध्या चर्चेत आहे.

तीन वेळा Mains, यंदा Prelimsमध्येच अडथळा

या उमेदवाराने Redditवरील r/UPSC या समुदायात आपला अनुभव शेअर केला. त्याने २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये सलग UPSC Mains परीक्षा दिली होती. मात्र यंदा पहिल्यांदाच तो Prelims परीक्षा उत्तीर्ण करू शकला नाही. “तीन वेळा सलग Mains दिली. यंदा पहिल्यांदाच Prelimsही क्लिअर झाली नाही. आता सगळं संपलं,” अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली. त्यानंतर त्याने यूपीएससीच्या तयारीदरम्यान जमवलेली सर्व पुस्तके आणि अभ्यासाचे साहित्य भंगारवाल्याला विकून टाकले.

त्याने विकलेल्या साहित्यामध्ये सुरुवातीला अभ्यासासाठी वापरलेली NCERTची पुस्तके, Laxmikanth, पहिल्या टेस्ट सिरीजचे पेपर, मॉक टेस्ट्स आणि स्वतःच्या हस्ताक्षरातील नोट्स यांचा समावेश होता. ही केवळ पुस्तके नव्हती. त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षांच्या आठवणी त्यांच्याशी जोडलेल्या होत्या. पहिल्या टेस्टपासून ते Mainsच्या उत्तरांचे वारंवार केलेले लिखाण आणि पहाटे ४ वाजता तयार केलेल्या विश्लेषणाच्या शीट्सपर्यंत सगळं त्या ढिगाऱ्यात होतं. पुस्तके भंगारवाल्याच्या वजनकाट्यावर ठेवताना मात्र त्याला काहीच जाणवत नव्हते. ज्या साहित्यामागे अनेक वर्षांची मेहनत होती, त्याची किंमत आता किलोच्या हिशेबाने ठरत होती.

२०२२मध्ये चांगली नोकरीही नाकारली

या तरुणाने २०२२मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारण्याऐवजी UPSCची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता. नागरी सेवेतून करिअर घडवता येईल, असा त्याला विश्वास होता. मात्र अनेक वर्षांनंतर त्याच निर्णयाबद्दल काही लोक त्याची खिल्ली उडवत होते, तर काहीजण त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते. या काळात त्याचे चार वर्षांचे नातेही संपले. वारंवार नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न, प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभी राहिलेली आशा आणि आणखी एक प्रयत्न करण्याची जिद्द हे सगळं त्याच्या प्रवासाचा भाग होतं.

लाखमोलाच्या आठवणींची किंमत फक्त ४६४ रुपये!

शेवटी भंगारवाल्याने त्याच्या पुस्तकांचे वजन केले आणि त्याच्या बदल्यात ४६४ रुपये दिले. जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याला ६०० रुपये मिळायला हवे होते, असे सांगितले. मात्र त्याने केवळ हसून उत्तर दिले की, या पुस्तकांकडून जे मिळवायचे होते ते मिळाले नाही; मग आणखी १००-२०० रुपये मिळाले किंवा कमी मिळाले, तरी त्याने काय फरक पडणार? या एका वाक्यात त्याच्या अनेक वर्षांच्या निराशेची तीव्रता दिसून आली.

मिळालेले ४६४ रुपयेही स्वतःसाठी ठेवले नाहीत

विशेष म्हणजे, भंगार विकून मिळालेले ४६४ रुपयेही त्याने स्वतःकडे ठेवले नाहीत. त्याने ही संपूर्ण रक्कम मंदिरात दान केली. हे दान पुढच्या UPSC प्रयत्नासाठी नव्हते, ना नशिबाची साथ मिळावी म्हणून. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, पुढच्या वेळी असं काही नाही. त्याच्या मते, हा एका दीर्घ प्रवासाचा शेवट होता.

सोशल मीडियावर उमेदवार भावुक

त्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक UPSC उमेदवार आणि माजी परीक्षार्थींनी त्याच्याशी सहमती दर्शवली. वर्षानुवर्षे तयारी करताना येणारा मानसिक ताण, सततच्या अपयशानंतर निर्माण होणारा थकवा आणि प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करण्याचा दबाव अनेकांनी अनुभवला असल्याचे सांगितले. या कहाणीतील सर्वात भावणारी गोष्ट ४६४ रुपये नाहीत. खरी गोष्ट आहे ती म्हणजे त्या पैशांच्या तुलनेत त्या पुस्तकांची त्याच्यासाठी असलेली किंमत.

भंगारवाल्याच्या काट्यावर कागदांचे वजन झाले आणि त्याची किंमत ४६४ रुपये ठरली. पण त्या कागदांमध्ये साठलेली वर्षांची मेहनत, अपूर्ण स्वप्नं, त्याग, नाती आणि आठवणी यांची किंमत किलोमध्ये मोजता येत नाही. पुस्तके भंगारवाल्याकडे गेली, पैसे मंदिरात गेले आणि तीन Mainsच्या प्रयत्नांनंतर तसेच यंदाच्या Prelims अपयशानंतर त्याचा UPSCचा प्रवास अखेर थांबला.