UPSC result topper Anuj Agnihotri: संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा २०२५ चा निकाल ६ मार्च, शुक्रवारी जाहीर झाला. अनुज अग्निहोत्री याने ऑल इंडिया पहिला क्रमांक मिळवत परीक्षेत टॉप केलं.
समाचार एजन्सीशी बोलताना टॉपर अनुज म्हणाला की, “मी एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना माझा कल मेडिकल सायन्सपेक्षा सिव्हिल सर्व्हिसकडे वळला. तेव्हाच मी ठरवलं होतं की पुढे सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाणार.”
त्याने सांगितलं की, “माझा पहिला प्रयत्न २०२३ मध्ये होता, ज्यात मला DENIX (डेनिक्स) सेवा मिळाली होती आणि हा माझा एकूण तिसरा प्रयत्न आहे. मी २०१७ मध्ये AIIMS जोधपूर मधून पदवी पूर्ण केली आहे.”
त्याने पुढे सांगितलं की, “मी इंटर्नशिप करत असताना प्रॅक्टिससोबत ऑनलाइन कोर्स घेऊन यूपीएससीची तयारी केली. त्यानंतर मी घरी जाऊनही अभ्यास सुरू ठेवला.”
या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. अनुजने सांगितलं की, त्यांचे वडील न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये कर्मचारी आहेत आणि आई गृहिणी आहे.
अनुज म्हणाला की, ही अशी परीक्षा आहे की पहिला क्रमांक येईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. पहिला क्रमांक मिळणं ही नशिबाची गोष्ट असते. तसेच त्यांनी सांगितलं की, जिंकू किंवा हरू, पण आपल्याला सतत प्रयत्न करत राहायला हवं.
अनुज अग्निहोत्री याच्या आई मंजू अग्निहोत्री म्हणाल्या की, हे त्याच्या कठोर मेहनतीचं आणि देवाच्या कृपेचं फळ आहे. प्रत्येक काम योग्य दिनचर्येनुसार केलं पाहिजे. अनुजची मेहनत आणि जिद्द पाहून मी नेहमी म्हणायचे की, पुढे अनुज नक्कीच काहीतरी मोठं करेल.

दरम्यान, अनुज अग्निहोत्रीने पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजेश्वरी सुवे एम आहे तर तिसऱ्या क्रमांकावर अकांश ढुल आहे. हा निकाल ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या लेखी परीक्षेवर आणि डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान झालेल्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) यांच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या मेरिट यादीप्रमाणे, एकूण ९५८ उमेदवारांची विविध अखिल भारतीय आणि केंद्रीय सेवांमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत चौथ्या क्रमांकावर राघव झुनझुनवाला, पाचव्या क्रमांकावर ईशान भटनागर आणि सहाव्या क्रमांकावर जिनिया अरोरा आहेत. तसेच सातव्या क्रमांकावर ए.आर. राजा मोहिदीन, आठव्या क्रमांकावर पक्शल सेक्रेटरी, नवव्या क्रमांकावर आस्था जैन आणि दहाव्या क्रमांकावर उज्ज्वल प्रियंक आहेत.
