आपलाच प्रोडक्ट किती दमदार आहे हे दाखवण्यासाठी कंपन्या काहीही करु शकतात. असा एक प्रकार नुकताच अमेरिकेतील एका किटकटनाशकांची फवारणी करणाऱ्या म्हणजेच पेस्ट कंट्रोल करणाऱ्या कंपनीने केलाय. या कंपनीने ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये काही झुरळं ठेवण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये देण्याची विशेष ऑफर केलीय.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरलॉना येथील ‘द पेस्ट इन्फॉर्मर’ नावाच्या कंपनीने आपल्या ग्राहकांना ही दोन हजार अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिलीय. तुमच्या घरामध्ये आम्ही १०० झुरळं सोडणार त्या बदल्यात आम्ही तुम्हाला दोन हजार अमेरिकन डॉलर्स देणार असं कंपनीकडून ग्राहकांना सांगितलं जात आहे.

झुरळांच्या माध्यमातून घरामध्ये अधिक झुरळं कशी वाढतात यासंदर्भातस संशोधन करण्याचा कंपनीचा विचार आहे. याच संशोधनासाठी त्यांना प्रयोगशाळेच्या रुपात एक घरच हवं आहे. त्या मोबदल्यात कंपनी संबंधित घरमालकाचा मोठी रक्कम देण्यासाठी तयार झाली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भातील जाहिरात पोस्ट केलीय. पेस्ट कंट्रोलची परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी आम्हाला काही जणांची मदत हवी असून जे या प्रयोगामध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहेत आम्ही त्यांच्या घरात झुरळं सोडणार आहोत. या मोबदल्यात आम्ही त्यांना दोन हजार डॉलर्स देणार आहोत, असं कंपनीच्या जाहिरातीमध्ये म्हटलंय.

३० दिवसांसाठी हा प्रयोग असणार असून या कालावधीमध्ये घरमालकांनी कंपनीने सांगितलेल्या तंत्राशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून झुरळं मारण्याचा किंवा घरामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नये. तसेच या ३० दिवसांनंतर घरातील झुरळं पूर्णपणे नष्ट होतील असा दावाही कंपनीनीने केलेला नाही. मात्र या झुरळांचा संसर्ग कमी करण्याची एक ठराविक पद्धथ नक्कीच निश्चित केली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे.

ज्या व्यक्तींना यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी कंपनीने आखून दिलेले नियम खालीलप्रमाणे :

  • घराची मालकी किंवा भाडेतत्वावरील करारपत्र असणाऱ्यांसोबतच करार केला जाईल.
  • यामध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा २१ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे.
  • उत्तर अमेरिकन खंडामध्येच या चाचण्या केल्या जाणार आहेत. ही झुरळं पाळीव प्राण्यांना त्रासदायक ठरणार नाहीत
  • या ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्या घरामधील कोणत्याही व्यक्तीने झुरळांसाठी इतर कोणत्याही पद्धतीची यंत्रणा, किंवा औषधं वापरु नयते.
  • हे संशोधन किमान ३० दिवस सुरु असेल.