Green Chilli Price in USA: भारतात भाजी खरेदी करताना विक्रेत्याकडे थोडी कोथिंबीर किंवा हिरवी मिरची मागणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. अनेक ठिकाणी विक्रेते ती आनंदाने मोफतही देतात. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला फारशी किंमत वाटत नाही. मात्र, परदेशात चित्र पूर्णपणे वेगळे असल्याचे एका व्हायरल VIDEO मधून समोर आले आहे.
सध्या सोशल मीडियावर एका भारतीय महिलेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ही महिला अमेरिकेतील एका सुपरमार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी जाते. नेहमीप्रमाणे इतर भाज्या पाहताना तिची नजर हिरव्या मिरचीच्या पॅकेटकडे जाते आणि पुढच्याच क्षणी ती अक्षरशः थबकते.
मिरचीच्या छोट्याशा पॅकेटवर लिहिलेली किंमत पाहून तिचा स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. त्यामुळे ती लगेच मोबाईल काढते आणि त्या संपूर्ण प्रकाराचा VIDEO तयार करून सोशल मीडियावर शेअर करते. हा व्हिडीओ काही तासांतच हजारो लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तो झपाट्याने व्हायरल झाला.
व्हिडीओमध्ये ती महिला सांगते की, अमेरिकेत काही भाज्यांचे दर इतके जास्त आहेत की, भाजीपाला खरेदी करतानाही महागड्या वस्तू घेत असल्यासारखे वाटते. विशेषतः हिरव्या मिरचीचा दर पाहून ती चांगलीच चक्रावून जाते.
तिने दाखवलेल्या पॅकेटमध्ये अवघ्या काही मिरच्या होत्या. तरीही त्याची किंमत पाहून अनेक भारतीय नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. भारतात इतक्या मिरच्या अनेकदा मोफत मिळतात; तर अमेरिकेत त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते, असे ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसते.
व्हिडीओच्या शेवटी ती पॅकेटचे वजनही दाखवते. ते अवघे ११४ ग्रॅम असल्याचे दिसते. त्यानंतर ती त्याचा प्रतिकिलो दर काढून दाखवते. हा दर भारतीय चलनात रूपांतरित केला असता, तो सुमारे ७०० रुपयांपर्यंत प्रति किलो पोहोचत असल्याचे ती सांगते. एवढेच नव्हे, तर अवघ्या १५ ते २० मिरच्या असलेल्या एका छोट्या पॅकेटची किंमत जवळपास ४०० रुपये असल्याचेही ती दाखवते.
हा VIDEO व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांची अक्षरशः रांग लागली. अनेकांनी भारतातील आणि अमेरिकेतील जीवनशैलीतील फरकावर भाष्य केले.
एका नेटकऱ्याने लिहिले, “भारतात महागाई आहे; पण तरीही मिरचीसाठी इतके पैसे द्यावे लागत नाहीत.” दुसऱ्या एका युजरने गमतीने म्हटले, “आता अमेरिकेत जाऊन मिरचीची शेती करावी लागेल बहुतेक.”
आणखी एका व्यक्तीने वेगळाच मुद्दा मांडला. त्याने लिहिले, “अमेरिकेत वस्तू महाग असल्या तरी तिथले उत्पन्नही त्याच प्रमाणात जास्त असते. त्यामुळे फक्त किंमत पाहून तुलना करणे योग्य नाही.”
तर काही भारतीय नेटकऱ्यांनी भारतातील विक्रेत्यांचे कौतुक केले. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, “आपल्याकडे तर मिरचीच नाही, कोथिंबीरही अनेकदा मोफत मिळते.” दुसऱ्याने अभिमानाने लिहिले की, मेरा भारत महान!
एकूणच, भारतात सहज उपलब्ध होणाऱ्या आणि अनेकदा विनामूल्य मिळणाऱ्या हिरव्या मिरचीची अमेरिकेतील किंमत पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे हा VIDEO सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, भारत आणि अमेरिकेतील दैनंदिन जीवनातील खर्चामधला मोठा फरक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
