भारतीय लोकांबाबत अमेरिकेतून आलेल्या एका पर्यटकाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि एक वक्तव्य केलं आहे. भारतीय लोक बेढब आणि आळशी असतात असं या पर्यटकाने म्हटलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर आता सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अमेरिकेतला हा पर्यटक जयपूरला आला, त्याने अंबर किल्ला चढताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो त्याचं म्हणणं मांडताना दिसतो आहे.
चार्ली इव्हान्स या पर्यटकाने पोस्ट केला व्हिडीओ
चार्ली इव्हान्स असं या पर्यटकाचं नाव आहे. त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओ रेकॉर्ड करत भारतीय बेढब आणि आळशी असतात असं विधान केलं आहे. एक किल्ला चढायचा आहे त्यातही लोक वारंवार थांबत आहेत. तसंच धूम्रपान करत आहेत आणि शीतपेयं पिण्यात वेळ घालवत आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यापेक्षा भारतीय लोकांना या सगळ्यामध्ये आनंद मिळतो आहे. तसंच किल्ल्याच्या माथ्यावर पोहचण्यासाठी त्यांना शॉर्टकट हवा आहे. लोक तिथे पोहचल्यावर थोडं आणखी फिरण्यास तयार नाहीत.
भारतीय लोक बेढब आणि आळशी
मला माहीत आहे भारतीय लोक बेढब असतात. मी आत्ता पाहतो आहे शेकडो लोक इथे आले आहेत. मी आत्ता अंबर किल्ला पाहतो आहे. माझ्याप्रमाणेच इतर लोकही आले आहेत. पण ते खूप आळसाने हा किल्ला बघत आहेत आणि चढाई करत आहेत. मला अनेकांनी विचारुन झालं आहे की किल्ल्याच्या माथ्यावर म्हणजेच शेवटच्या टोकावर पोहचायला किती वेळ लागेल. साधारण २० मिनिटांच्या चढाईसाठी या भारतीय पर्यटकांना वेळ लागतो आहे. जे भेट द्यायला आले आहेत त्यांच्यापैकी अनेकजण किल्ला पूर्ण पाहातही नाहीयेत किंवा वरती जाण्यास साधे इच्छुकही नाहीत. आतमध्ये येण्यासाठी त्यांनी पैसे भरले आहेत तरीही अर्ध्या वाटेतून हे लोक परत जात आहेत. हे भारतीय पर्यटक खूपच आळशी आहेत. असं चार्ली इव्हान्सने म्हटलं आहे. त्यानंतर त्याने दिवस संपल्यानंतरचाही एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणतोय की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की भारतीय लोक आळशी आणि बेढब असतात, त्यांनी ते सिद्ध केलं आहे. अर्ध्या वाटेवरुन लोक परत जात आहेत, कुणाला सिगारेट ओढावीशी वाटते आहे कुणाला शीतपेयं प्यावीशी वाटत आहेत. या व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर काय चर्चा?
या व्हिडीओला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेक लोक या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी या पर्यटकाचं म्हणणं बरोबर आहे असं म्हटलं आहे. अनेक भारतीय लोक फिटनेस आणि स्वतःचं सौष्ठव याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. तसंच काहींनी अशाही कमेंट केल्या आहेत की जोपर्यंत एखाद्या पर्वतावर मंदिर नाही तोपर्यंत भारतीय लोक त्या डोंगरावर चढाई कऱण्याचे कष्ट घेत नाहीत. दुसऱ्या एकाने लिहिलं आहे त्या ठिकाणी एक मंदिर बांधा बघा किती गर्दी होते. एक युजर म्हणतो ब्रिटिश आले त्यांनी आपल्यावर तोडा, फोडा आणि राज्य करा या नीतीने राज्य केलं होतं. आता हे लोक येऊन आपल्याला शिकवत आहेत. अशा विविध कमेंट या व्हिडीओवर येऊन धडकत आहेत.

