महाराष्ट्रामध्ये काही आठवड्यांपूर्वी हर्बल तंबाखू आणि गांजा या विषयावरुन चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अंमली पदार्थविरोधी पथकाला हर्बल तंबाखू आणि गांजामधील फरक कळत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं. या हर्बल तंबाखूच्या वक्तव्यावरुन वरोधकांनी अनेकदा मलिक यांना टोला लगावल्याचं पुढील काही दिवसांमध्ये पहायला मिळालं होतं. मात्र अमेरिकेतील ओकलाहोमा येथे गांजा आणि कोथिंबीरमधील फरक न समजल्याने एका महिलेचा अपमान करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

समोर आलेल्या माहितीनुसार ओकलाहोमा येथील एक महिला तिच्या बहिणीला काही खाद्य पदार्थ देण्यासाठी चर्चमध्ये भेट होईल म्हणून गेली होती. यावेळी या महिलेकडे काही खाद्यपदार्थांसोबतच कोथिंबरीही होती. मात्र त्यावेळी तिला चर्चमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तिने गांजाची पानं आणलं आहेत असा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. मात्र या महिलेने आपल्याकडे असणारी गोष्ट ही गांजा नसून कोथिंबीर आहे असं पटवून देण्याचा प्रयत्न केला. तरी तिला चर्चमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. ही महिला झालेल्या अपमानामुळे चर्चच्या प्रवेशद्वाराजवळच रडू लागली. हा सर्व प्रकार ज्या महिलेसोबत घडला तिचं नाव अ‍ॅशले अ‍ॅण्टीव्हेर्स असं आहे. तुरुंगामधील कैद्यांच्या प्रार्थनासभेच्या वेळी रिडम्पशन युनायडेट मेथडीस्ट चर्चमध्ये श्लेला प्रवेश नाकारण्यात आला.

नक्की पाहा >> ‘महाराष्ट्रातील लोक तंबाखू समजून गांजा तर खात नसतील?’, ‘तंबाखू म्हटल्याने गांजा नाराज’; नवाब मलिकांवर पडली ‘ट्रोल’धाड

या चर्चमध्ये तुरुंगामधील आरोपींसाठी काही विशेष जागा राखीव ठेवलेल्या असतात. या आरोपींमध्ये या महिलेची बहिणीही असल्याने ती तिला प्रार्थनेच्या निमित्ताने भेटण्यासाठी आली होती. मात्र त्यावेळी तिने खरेदी करताना कोथिंबीर घेतली होती. जी प्रवेशद्वारावरील महिला कर्मचाऱ्याला गांजाची पानं वाटली. यावेळी या महिला कर्मचाऱ्याने अ‍ॅशलेला रोखले आणि चर्चमध्ये प्रवेश नाकारला. “तुला आताच इथून निघावं लागेल. तुला हे अमलीपरार्थ आत घेऊन जाण्यास परवानगी नाहीय,” असं अ‍ॅशलेला ही महिला सांगत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तर अ‍ॅशले या महिलेला, “ही कोथिंबीर आहे. हा खाद्यपदार्थ आहे. हे अमलीपदार्थांमध्ये येत नाही. थांबा मी तुम्हाला समजावते,” असं या महिलेला सांगताना दिसत आहे.

अ‍ॅशलेने तर चर्चच्या काही कर्मचाऱ्यांना नाकाने या वनस्पतीचा वास घेऊन पाहा असंही म्हटलं. मात्र तो गांजा असेल असं समजून कोणीच पुढं आलं नाही. “मी तशा (ड्रग्ज घेणाऱ्या) लोकांमधील नाही. मी जाते हवं तर इथून पण तुम्ही एकदा याचा वास घेऊन पाहा. मला फक्त तुम्हाला हे पटवून द्यायचं आहे की हे तुम्ही समजताय तसं नाहीय,” असं अ‍ॅशले या लोकांना सांगताना दिसतेय.

हा गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पाचारण केलं आणि काय प्रकरण आहे समजून घेतलं. या तपासादरम्यान ही महिला म्हणजेच अ‍ॅशले खरं बोलत असल्याचं समोर आलं. त्यानंतर चर्चने एक पत्रक काढून कैद्यांच्या अशा विशेष प्रार्थनासभांदरम्यान त्यांच्या नातेवाईकांना कैद्यांना भेटण्यास परवानगी असेल पण त्यावेळेस कैद्यांना कोणतेही बाहेरचे खाद्य पदार्थ देता येणार नाहीत. तसेच चर्चने पुढील आठवड्यात अ‍ॅशलेला चर्चमध्ये प्रवेश दिला जाईल असंही म्हटलं.