लग्न मोडण्याची कारणं अनेक असतात. पण गेल्या आठवड्याभरात उत्तर प्रदेशमध्ये फारच क्षुल्लक कारणांनी लग्न मोडल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. गेल्या महिन्यात इथल्या एका गावात नवरदेवाच्या कुटुंबियांना रसगुल्ला मिळाला नाही म्हणून लग्न मोडले, तर एका मुस्लिम नवरदेवाने लग्नाच्या पंगतीत मांसाहारी भोजन मिळाले नाही म्हणून निकाह करायला नकार दिला. आता लग्न मोडण्याची इतकी ‘फाल्तू’ कारणंही असू शकतात हे तुमच्या लक्षात आले असेलच पण उत्तर प्रदेशमधल्या मुलीने एका वेगळ्याच कारणासाठी आपले लग्न मोडले आहे. नवऱ्याला ‘सांप्रदायिक’, ‘दृष्टीकोन’ हे शब्द लिहिता येईना ना धड उच्चारताही येईना तेव्हा नवऱ्या मुलीने या मुलाला चक्क नापास केलं. लिहिताही येत नसलेल्या मुलाशी आपण लग्न करणारच नाही असे या मुलीने कुटुंबियांना ठणकावून सांगितले.

उत्तर प्रदेशमधल्या मणिपूरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. पाचवीपर्यंत शिकलेल्या मुलीला फर्राकाबाद इथला मुलगा पाहायला आला होता. पाहण्याच्या कार्यक्रमात त्याने मुलीला हिंदीतले काही शब्द लिहून दाखवायला सांगितले. या मुलीने ते लिहूनही दाखवले, तेव्हा मुलाने तिच्याशी लग्न करायला होकार दिला. पण मुलीने जेव्हा तेच शब्द मुलाला लिहायला सांगितले तेव्हा मात्र त्याला एकही शब्द धड लिहिता येईना. त्याने शब्द तर चुकीचे लिहिलेच पण काही शब्द त्याला नीट उच्चारताही येईना. तेव्हा या मुलीने लग्नाला साफ नकार दिला. कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ही मुलगी काही ऐकली नाही ती शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिली.