लोचा झाला रे! लग्नासाठी चार तरुणांसोबत पळाली; पण लगीनगाठ बांधण्यावरून ‘कन्फ्यूज’ झाली, अन्…

पंचायतीने ‘लकी ड्रॉ’द्वारे निवडला पती!!

उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एक तरुणी लग्न करण्यासाठी एक, दोन नव्हे तर चार तरुणांसोबत आपलं घर सोडून पळाली. पण, नंतर चौघांपैकी पती म्हणून कोणाची निवड करावी यामध्ये तिचा गोंधळ उडाला. अखेर अनोख्या पद्धतीने तरुणीसाठी पतीची निवड करण्यात आली, तेव्हापासून ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

‘लाइव्ह हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना कोतवाली टांडाच्या अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पाच दिवसांपूर्वी चार तरुणांनी तरुणीला घराबाहेर नेले. आरोपींनी त्या मुलीला दोन दिवस नातेवाईकांकडे लपवून ठेवले, पण खरी घटना समजल्यावर त्यांना त्यांच्या गावात परत पाठवण्यात आलं. त्यानंतर, तरुणीच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल करण्याची तयारी केली होती. पण गावकऱ्यांनी त्यांना अडवलं. नंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी गावात पंचायत बसवण्यात आली.

पंचायतीने काढला लकी ड्रॉ!

पंचायतीने चारपैकी एका तरुणाने त्या तरुणीशी लग्न करावं असं सांगितलं, पण चौघांपैकी कोणीही तिच्याशी लग्न करण्यास कोणीही तयार होत नव्हतं. तोडगा काढण्यासाठी तीन दिवस पंचायतीने या घटनेवर चर्चा केली, पण कोणाशी लग्न करावं याचा निर्णय घेण्यात तरुणीचाही गोंधळ उडत होता. त्यामुळे अखेर चिठ्ठ्या टाकून नवरा निवडण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यानंतर चार तरुणांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या व गावातल्या एका लहान मुलाला एक चिठ्ठी उचलण्यास सांगण्यात आलं. अखेर त्या चिठ्ठित ज्या तरुणाचं नाव निघालं त्याच्यासोबत तरुणीचं लग्न ठरवण्यात आलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttar pradesh panchayat in rampur holds lucky draw to select groom for girl who eloped with four men sas