देवभूमी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उत्तराखंडमध्ये अशी अनेक प्रसिद्ध धार्मिक ठिकाणे आहेत, जिथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यात काही वर्षांपासून हे पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे. देवदर्शनासह साहसी ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठीही अनेक जण उत्तराखंडमध्ये जात असतात. मात्र, असे करताना काही जण उत्तराखंडमधील कायदेशीर नियम मोडताना दिसतात. देवदर्शनाच्या नावाखाली पर्यटक रस्त्यावर रील, फोटो व्हिडीओ शूट करताना, तसेच अनेकदा वाहनांवर स्टंटबाजी करताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटक नंबर प्लेट नसलेल्या कारच्या सनरूफवरुन चढून स्टंटबाजी करीत होते. त्यांना पोलिसांनी कडक शब्दांत फटकारले आणि नंतर चालान बजावले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे प्रकरण उत्तराखंडच्या पौरी गढवालमधील आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही पर्यटक नंबर प्लेट नसलेल्या वाहनाच्या सनरूफवर उभे राहून स्टंटबाजी करताना दिसत आहेत. याचदरम्यान तिथून पोलिसांची एक व्हॅन येते. यावेळी व्हॅनमधील काही पोलिसांनी खाली उतरून सनरूफवर उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला आधी खडसावले आणि नंतर वाहनावर चालान फाडले.

सुरुवातीला तरुणांनी पोलिसांशी वरचढ आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र महिला पोलिसाने त्यांना फटकारण्यास सुरुवात केल्याने तरुण घाबरले.

उत्तराखंड पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ

महिला पोलीस अधिकाऱ्याने तरुणांना खडसावले की, अशी गुंडगिरी करीत फिरू नका. हे धार्मिक स्थळ आहे. कोणाच्याही श्रद्धेला धक्का पोहोचेल, असे काहीही करू नका. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने तरुणांना कारवर नंबर प्लेट का नाही, हे लोक वाहनाबाहेर का आहेत, गाडीत जागा नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केली. त्यावर त्यातील काही तरुणांनी खाली उतरून व्हिडीओ शूट करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तरुणांना फटकारले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. त्याच वेळी पोलिसांनी तरुणांना एक हजार रुपयांचे चालान बजावले.

More Stories On Viral Video : पुराच्या वार्तांकनादरम्यान पत्रकाराचा अचानक घसरला पाय आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

हा व्हायरल व्हिडीओ उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी ‘गजब बेइज्जती है यार’ असा एक मीमही वापरण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

या व्हिडीओच्या कमेंटमध्ये एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, तुम्ही नंबर प्लेट नसलेली गाडी का सोडली? ती गाडी ताब्यात घेतली पाहिजे होती. दुसऱ्याने लिहिले की, जे बाईक चालवतात आणि त्यावर तीन लोक बसतात. तसेच गाडी चालविताना मोबाईलवर बोलतात त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. असे डझनभर लोक डेहराडूनच्या रस्त्यावर दिसतात. आणखी एका लिहिले की, या यूट्यूब आणि रील बनविणाऱ्या लोकांना धडा शिकविण्याची नितांत गरज आहे. शेवटी एकाने पोलिसांनाच प्रश्न विचारला की, नंबर प्लेट नसलेल्या वाहनावर फक्त १००० रुपयांचे चालान? व्वा! पोलीस तुम्हाला सलाम.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand police took action against making reels on cars sunroof without number plate in pauri garhwal video goes viral sjr