Vande bharat train viral video: सोशल मीडियाच्या युगात एखादी साधी गोष्टही कधी मोठा वाद निर्माण करू शकतं, याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. व्हायरल रील्स, ट्रोलिंग आणि मतभेदांनी भरलेल्या प्रतिक्रिया, यामुळे कोणताही विषय काही क्षणांत चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. विशेषतः वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनशी संबंधित गोष्ट असेल तर लोकांच्या प्रतिक्रिया अधिक तीव्र होतात. सुविधा, भाडे, प्रवासाचा दर्जा आणि प्रवाशांच्या अपेक्षा यावर आधीच चर्चा सुरू असते. अशा वातावरणात एखादा हलकाफुलका विनोद काहींना मजेशीर वाटतो, तर काहींना तो अनावश्यक आणि वादग्रस्त वाटतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ हाच प्रश्न उभा करत आहे.
हा व्हिडीओ वंदे भारत ट्रेनमधील आहे. एक महिला आपला नवरा आणि लहान बाळासोबत प्रवास करत होती. तिने बाळासाठी वेगळी सीट बुक केली होती आणि त्यासाठी १५०० रुपये दिले होते. पण, प्रवासात बाळ त्या सीटवर बसलंच नाही. ते बाळ कधी आईच्या, तर कधी वडिलांच्या कुशीत झोपलेलं होतं. याच गोष्टीवर महिलेने एक गमतीशीर रील बनवली.
पाहा व्हिडीओ
त्या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, ज्या सीटसाठी एवढे पैसे दिले, त्या सीटवर बाळाऐवजी फक्त १०० रुपयांची चप्पल आरामात ठेवलेली आहे. तिने चपलांना ‘प्रीमियम प्रवासी’ असं म्हणत मजा केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकताच तो वेगाने व्हायरल झाला आणि खूप लोकांनी तो पाहिला.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रियांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. काही लोकांना हा व्हिडीओ फक्त मजेशीर वाटला. “चप्पलचं तर नशीबच निघालं,” अशा गमतीशीर प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.
काहींनी असंही म्हटलं की, लहान मुलासाठी वेगळी सीट घेणं हा आई-वडिलांचा स्वतःचा निर्णय असतो. पण, अनेक लोकांनी या रीलवर नाराजी व्यक्त केली. “स्वतः घेतलेल्या निर्णयासाठी रेल्वेला टोमणा मारण्याची गरज काय?” असा प्रश्न त्यांनी विचारला. काहींनी सीटवर चप्पल ठेवणं चुकीचं असल्याचं सांगितलं, तर काहींनी हा व्हिडीओ फक्त व्ह्युज मिळवण्यासाठी बनवल्याची टीका केली. “चूक स्वतःची आणि दोष रेल्वेचा,” असं म्हणत काही युजर्सनी संताप व्यक्त केला, त्यामुळे एका साध्या रीलमुळे सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या गटांत प्रतिक्रिया आल्या.

