scorecardresearch

वटपौर्णिमा विशेष : वडाची ३८४ झाडे लावणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीबाई

त्यांच्या कार्याइतकीच त्यांचा प्रवासही थक्क करणार आहे, त्यांच्या या कार्यासाठी त्यांना २०१९ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे

वटपौर्णिमा विशेष : वडाची ३८४ झाडे लावणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीबाई
पर्यावरणासंदर्भातील योगदानासाठी त्यांना २०१९ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून घरी आणून त्याची पुजा कारणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे. दर वटपौर्णिमेला यासंदर्भातील जनजागृती करणारे मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असतात. मात्र एकीकडे केवळ वटपौर्णिमेच्या दिवशीच वडाचं महत्व वाढतं असं समजणारे, वडाच्या झाडाच्या फांद्या कापून घरी आणणारे असतात तर दुसरीकडे तामिळनाडूमधील एका आजींनी आपलं संपूर्ण आयुष्य वडाची झाडं लावण्यासाठी खर्च केलंय. जाणून घेऊयात याच आजींबद्दल…

२०१९ साली सालाबादप्रमाणे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी असणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यांमध्ये यादीमध्ये तामिनाडूमधील पाच जणांची नावं होती. मात्र त्यातही सर्वात खास नाव होतं ते एका १०६ वर्षांच्या आजीबाईंच. सालुमार्दा थिमक्का असं या आजींचं नाव. या आजी आज १०८ वर्षांच्या आहेत. पर्यावरणासंदर्भातील योगदानासाठी त्यांना २०१९ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हुलिकलजवळ त्यांनी अंदाजे ७० वर्षांपूर्वी वडाची ३८४ झाडे लावली आणि त्यानंतर त्यांनी झाडे लावण्याचा सपाटाच सुरु केला. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना २०१९ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘मला पुरस्कार जाहीर झाला आहे. पण मला खरोखर हा पुरस्कार काय असतो याची कल्पना नाही,’ ही थिमक्का यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. सध्या थिमक्का या बेल्लूर तालुक्यातील बेल्लूर गावात राहणाऱ्या त्यांच्या त्यांचा दत्तक पुत्राकडे म्हणजेच उमेशकडे राहतात. हा पुरस्कार मला जाहीर झाला असला तरी त्याने माझे पोट भरणार नाही. मला पुरस्कार जाहीर झाला आहे इतकीच माहिती मला आहे या पुरस्काराबद्दल मला काहीही कल्पना नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली होती. ‘मी पुरस्कार खाऊ शकत नाही’ अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवलेली.

एकीकडे केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा झालेली असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने मात्र त्यांच्याकडे कानाडोळा केल्याचं पहायला मिळालं. याबद्दल थिमक्कांनी स्वत: नाराजी व्यक्त केली होती. ‘राज्य सरकारने मला मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप मदत काही आली नाही. ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या पेन्शनअंतर्गत मला महिन्याचे ५०० रुपये मिळायचे. पण आजच्या काळात ५०० रुपयात महिना काढणे अशक्य आहे. त्यामुळेच मी मागील वर्षापासून हे पैसे स्वीकारणे बंद केले आहे.’, असे थिमक्का यांनी सांगितले होते. थिमक्कांना आत्तापर्यंत त्यांच्या या पर्यावरणसंरक्षक कार्यासाठी शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या हुलिकलच्या घरामध्ये अनेक पुरस्कार आणि प्रमाणपत्रे आहेत.

थिमाक्कांची थक्क करणारी कथा

थिमक्कांची कथा त्यांच्या कार्याइतकीच थक्क करणारी आहे. बिक्कलू चिक्कया यांच्यासी लग्न झाल्यानंतर थिमक्का हुलिकल येथे राहायला आल्या. दिवसभर काम करुन मिळावलेले पैश्यात पोट भरायचं अशा परिस्थितीमध्ये हे दोघे गावामध्येच पडेल ते काम करु लागले. लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी या दोघांना मूल होईना. मात्र हुलिकलसारख्या लहान गावामध्ये या विषयावरुन चर्चा होऊ लागली आणि या दोघांना त्याचा त्रास होऊ लागला. या गोष्टीकडून लक्ष विचलित करण्यासाठी दोघेही काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. त्याच वेळी हुलिकल गावाच्या जवळ रस्ता बांधण्यास सुरुवात झाली. या रस्त्याच्या बाजूने झाडं लावण्याची कल्पना थिमक्कांच्या मनात आली. त्यानुसार थिमक्का रोज एक वडाचं झाड या रस्त्याच्या बाजूला लावू लागल्या. या कामामध्ये त्यांना पती बिक्कलूही मदत करायचे. या दोघांनी गावकऱ्यांकडून होणाऱ्या चर्चेकडे दूर्लक्ष करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या वड लागवडीमधील झाडांची संख्या साडेतीनशेहून अधिक झाली. दोघेही मिळून या झाडांना पाणी घालायचे, त्यांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घ्यायचे. आज हुलिकल गाव येण्याआधीपासूनच चार किलोमीटरवरुन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वटवृक्षांची रांगच दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वडाची झाडं असलेला हा सुमारे चार किलोमीटरचा पट्टा म्हणजे थिमक्का आणि बिक्कलू यांनी काही दशकांपूर्वी दुतर्फा लावलेली वडाची रोपटी, जी आता वटवृक्ष झाली आहेत. थिमक्का नावाने काम सुरु करणाऱ्या या आजीबाईंना आता ‘सालुमार्दा थिमक्का’ असं नाव मिळालं आहे. ‘सालुमार्दा’ या कानडी शब्दाचा अर्थ होतो एका रांगेत लावलेली झाडं. आता थिमक्का यांचा वारसा त्यांचा दत्तक पुत्र असणाऱ्या उमेशनेही सुरु ठेवला असून तो रोज एक झाड लावतो. १९९१ साली बिक्कलू यांचे निधन झाल्यानंतरही थिमक्कांनी आपले काम सुरु ठेवले आहे.

अशाप्रकारे जगाला समजले थिमाक्कांचे कार्य

आपल्या पतीबरोबर थिमक्कांनी वडाची झाडे लावण्यास सुरुवात केली. मात्र एका घटनेनंतर त्यांचे नाव जगभरात झाले. थिमाक्कांचा मुलगा उमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा हुलिकल गावाजवळून कर्नाटकातील एका खासदाराचा ताफा जात होता. गाडीमध्ये अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी संपूर्ण ताफा थांबवला आणि ते खाली उतरले. खाली उतरल्यानंतर ते खासदार रस्त्याच्याकडेला असणाऱ्या वडाच्या झाडा खाली सावलीत काही क्षणांसाठी निवांत बसले. मोकळ्या हवेमुळे आणि सावलीमुळे त्यांना थोड्याच वेळात बरं वाटू लागलं. थोडं बरं वाटू लागल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अशी वडाची झाडं एका रांगेत कोणी झाडं लावली असा प्रश्न त्यांना पडला. यासंदर्भात त्यांनी विचारपूस केली असता स्थानिकांनी त्यांना थिमक्कांचं नाव सांगितलं. लगेचच खासदार साहेब आपल्या लव्याजम्यासहीत थिमक्कांच्या घरी त्यांचे आभार मानण्यासाठी पोहचले. निघताना थिमक्कांनी खासदाराला जेवण करुन खायला घातल्याचंही उमेश यांनी सांगितलं. या खासदाराने त्याला आलेला हा अनुभव एका कार्यक्रमात सांगितला. तेव्हापासून थिमक्कांच्या कार्याची माहिती जगभरात पसरली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-06-2021 at 13:57 IST

संबंधित बातम्या