Anant Ambani Help Vedansh Singh For SMA Treatment: हरयाणाचा २३ महिन्यांचा वेदांश सिंग सध्या Spinal Muscular Atrophy (SMA) Type 1 या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या उपचारासाठी तब्बल ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने कुटुंबासमोर मोठे आव्हान उभे राहिले. वेदांशच्या उपचारांसाठी मुंबईत मोठी निधी संकलन मोहीमही सुरू करण्यात आली होती. आता या मोहिमेला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मयुरेश गुजर या तरूण मुलाने केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी आशा निर्माण झाली आहे. मयुरेश गुजर यांच्या म्हणण्यानुसार, अनंत अंबानी यांनी वेदांशच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांच्या टीमकडून अद्याप अधिकृत पुष्टी मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे गुजर यांनी सांगितले आहे.
९ कोटींच्या उपचारांसाठी सुरू होती धडपड
वेदांशच्या उपचारासाठी मयुरेश गुजर आणि त्यांच्या टीमने मुंबईत निधी संकलन मोहीम (fund raising) सुरू केली होती. नागरिकांना मदतीचे आवाहन करत विविध ठिकाणी मोहीम राबवण्यात आली. या प्रयत्नांतून आतापर्यंत सुमारे २.२२ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम मोठी असल्याने मोहीम सुरूच होती.
लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी घडला ‘तो’ क्षण
गुजर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या मोहिमेदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २१ सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांच्या टीमचे बॅनर अनंत अंबानी यांच्या निदर्शनास आले. गुजर यांनी सांगितल्याप्रमाणे, अनंत अंबानी यांनी गाडी थांबवून टीमशी जवळपास पाच मिनिटे संवाद साधला. यावेळी गुजर यांनी त्यांना वेदांशची परिस्थिती आणि सुरू असलेल्या निधी संकलन मोहिमेबद्दल माहिती दिली.
‘वेदांशच्या उपचाराचा खर्च मी करतो’
गुजर यांनी सांगितले की, या संवादादरम्यान अनंत अंबानी यांनी वेदांशच्या उपचारासाठी कितीही खर्च आला तरी तो आपण उचलू, असे सांगितले. तसेच वेदांशला त्यांच्या रुग्णालयात आणण्यास सांगितल्याचा दावाही गुजर यांनी केला आहे. दोन्ही बाजूंनी संपर्क क्रमांकांची देवाणघेवाण झाल्याचेही त्यांनी सांगितले. हा क्षण त्यांच्या संपूर्ण टीमसाठी भावुक करणारा होता. अनेक दिवसांची धावपळ, झोप न लागलेल्या रात्री, पाऊस आणि उन्हात केलेले प्रयत्न या एका क्षणामुळे सार्थकी लागल्याची भावना गुजर यांनी व्यक्त केली.
अद्याप अधिकृत माहितीची प्रतीक्षा
मात्र, या दाव्यानंतरही अनंत अंबानी किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अधिकृतरित्या विचारणा झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गुजर यांनी स्वतःच्या व्हिडीओमध्येही त्यांच्या टीमकडून पुढील संपर्काची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट केले आहे. वेदांश आता २३ महिन्यांचा असल्याने उपचाराला होणारा विलंब महत्त्वाचा ठरू शकतो, असे गुजर यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
व्हिडीओला लाखो व्ह्यूज
गुजर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला असून, त्याला ६० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी गुजर आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले. काही युजर्सनी या प्रसंगाला भावनिक प्रतिक्रिया देत वेदांशच्या उपचारासाठी पुढील मदत आणि सकारात्मक बातमीची अपेक्षा व्यक्त केली आहे. गुजर यांनी या संपूर्ण प्रवासातून एकच गोष्ट शिकल्याचे म्हटले, “काहीही अशक्य नाही.” (Nothing Is Impossible).
