अनेक देशांमध्ये सीमाप्रश्नावर वाद सुरु असतानाच रशियाने थेट शुक्र ग्रहावर दावा सांगितला आहे. आपल्या आगामी अवकाश मोहिमांसंदर्भातील माहिती देताना शुक्र हा रशियन ग्रह असल्याचे आम्ही मानतो असं रशियाने सांगितल्याचे वृत्त सीएनएनने दिलं आहे. दिमित्री रोगोजिन, रशियन अवकाश महामंडळ म्हणजेच रशियन स्पेस कॉर्पोरेशन अर्थात रोझकोसमॉसचे प्रमुख असणाऱ्या दिमित्री रोगोजिन यांनी लवकरच शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केलं आहे. सध्या रशियाने शुक्र ग्रहावर ‘व्हिनिर-डी’ मोहीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याशिवाय अमेरिकेबरोबर एकत्र येऊन ही नवीन मोहिम आखण्याचा रशियाचा विचार असल्याचे रशियामधील सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या टीएएसएसने म्हटलं आहे.

मॉस्कोमध्ये हेलिकॉप्टरसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या हेलीरशिया २०२० या कार्यक्रमामध्ये पत्रकारांशी बोलताना रोगोजिन यांनी १५ सप्टेंबर रोजी शुक्र ग्रहावरील मोहिमेसंदर्भातील माहिती दिली. “शुक्र ग्रहावर जाण्याचा आमचा विचार आहे,” असं रोगोजिन म्हणाले. “शुक्र हा रशियन ग्रह आहे असं आम्ही मानतो त्यामुळे यासंदर्भात आम्ही अधिक उशीर करता कामा नये,” असंही रोगोजिन म्हणाले. रशियन अंतराळ संशोधन संस्थेच्या २०२१-२०३० च्या दहा वर्षांच्या अवकाश मोहिमांच्या कार्यक्रमांमध्ये शुक्र मोहिमेचा समावेश आहे असंही रोगोजिन यांनी स्पष्ट केलं आहे. पृथ्वीवर आढळणार फॉस्फीन वायू शुक्र ग्रहाच्या वातावरणामध्येही आढळून आल्याचे स्पष्ट झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच रशियाने शुक्र मोहिमेसंदर्भातील माहिती दिली आहे. शुक्र हा पृथ्वीचा सख्खा शेजरी आहे. मात्र तो इतर ग्रहांच्या उलट दिशेने परिक्रमा करतो.

कार्डीफ विद्यापिठातील प्राध्यापक जेन ग्रेव्हिएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्र ग्रहावरील वातावरणासंदर्भात केलेलं संशोधन मागील आठवड्यामध्ये नेचर अॅस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झालं. या ग्रुहवार फॉस्फीन वायू आढळल्याने आता मंगळाबरोबरच या ग्रहाबद्दल अधिक संशोधन करुन आपल्या सौर्यमालेबद्दल अधिक जाणून घेण्यासंदर्भातील उत्सुकता अधिक वाढली आहे. फॉस्फीनचं अस्तित्व असल्याने पाण्याचा अंक्ष असणाऱ्या शक्यता असणाऱ्या मंगळ आणि आपल्या सौरमालेतील एन्सेलेडस आणि युरोपासारख्या चंद्रांबरोबरच आता शुक्राबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

नवीन संशोधनामुळे शुक्र ग्रहावर आणि त्याच्या वातावरणामध्ये सजीव सृष्टीचा काही पुरावा सापडतोय हा हे शोधणं आवश्यक असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. युरोपीयन अवकाश संशोधन संस्थेच्या माहितीनुसार शुक्रासंदर्भात संशोधन करण्याचा रशियन अंतराळसंस्थेला मोठा अनुभव आहे. १९६७ ते १९८४ च्या कालावधीमध्ये शुक्र ग्रहासंदर्भात संशोधन करण्यात रशियन आघाडीवर होतो असं युरोपीन अवकाश संशोधन संस्थेच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.