Little Girl Selling Momo: पहाडी पोशाखात, अंगावर शॉल गुंडाळून बसलेल्या एका निष्पाप चिमुरडीचा सोशल मीडियावर प्रचंड बोलबाला सुरू आहे. तिची निरागसता, बोलण्याची गोड शैली आणि चेहऱ्यावरील क्युटनेसवर इंटरनेटची जनता पार फिदा झाली आहे. डोंगराळ भागांमध्ये मोमो विकण्याचा अभिनय करणाऱ्या या चिमुरडीने तिच्या एकाच संवादाने लाखो लोकांची मने जिंकून घेतली आहेत.
‘आमच्याकडे मोमो महागच मिळतात!’
व्हायरल व्हिडिओची सुरुवात एका प्रश्नाने होते— “तुम्ही पहाडी आहात का? इथे काय करता?” यावर ती लहान मुलगी हसत मान हलवून सांगते, “मी इथे मोमो विकते.” जेव्हा तिला मोमोच्या एका प्लेटची किंमत विचारली जाते, तेव्हा ती अत्यंत गोड हास्य फेकत “७०० रुपये!” असे सांगते. यावर विचारणारा व्यक्ती “डोंगराळ भारत तर खूप महागाई आहे, तुम्ही खूप महाग देताय” असे म्हणतो. त्यावर अजिबात न अडखळता ती चिमुरडी उत्तर देते, “आमच्या इथे मोमो महागच मिळतात!”
नेटकरी म्हणे, क्युटनेसवरही टॅक्स भरावा लागतो का?
नेटकऱ्यांनी तर कमेंट बॉक्समध्ये या गोंडस चिमुकलीवर प्रेमाचा आणि कौतुकाचा अक्षरशः वर्षाव केला आहे. “१०० रुपयांचे मोमो आणि उरलेले ६०० रुपये तर फक्त तिच्या क्युटनेसचा टॅक्स आहे!” अशा मजेशीर प्रतिक्रिया देत युझर्स तिच्या निरागसतेवर फिदा झाले आहेत. एका युझरने लिहिले की, “ती ७०० मागतेय, पण तिचा गोड चेहरा पाहून मी तर तिला १००० रुपये द्यायलाही तयार आहे,” तर दुसऱ्याने, “मोमोपेक्षा ती तिच्याशी केलेल्या गप्पांची किंमत जास्त आहे,” असे म्हणत तिच्या बोलण्याचे कौतुक केले. “गुपूचूप घे, वाद घालू नको” अशी कमेंट करत चिमुकलीची बाजू मांडली. क्युटनेसचाही टॅक्स भरावा लागतो का अशा भन्नाट कमेंट्स करत लोकांनी अद्विकाच्या या गोंडस व्हिडिओवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.
बालकलाकार अद्विका आणि पालकांची निर्मिती
ही मुलगी खरोखर मोमो विकत नसून ती एक लोकप्रिय किड कंटेंट क्रिएटर आहे. अद्विका असे या चिमुरडीचे नाव असून, तिचे वडील सौरभ आणि आई साक्षी यांनी हा मजेदार व्हिडिओ बनवला आहे. तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून तिच्या रोजच्या आयुष्यातील असेच मजेशीर आणि क्युट व्हिडिओ शेअर केले जातात. हा व्हिडिओ केवळ एक कौटुंबिक गंमत म्हणून शूट करण्यात आला होता, परंतु तिची ही निरागस ॲक्टिंग तुफान व्हायरल झाली.
अडीच कोटींहून अधिक व्ह्यूजचा पाऊस

या व्हिडिओने सोशल मीडियावर व्ह्यूजचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. अवघ्या काही दिवसांत या व्हिडिओला २.५ कोटींपेक्षा (२५ मिलियन) जास्त व्ह्यूज मिळाले असून, ९ लाख ५० हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. तसेच तब्बल ६,५०० हून अधिक युझर्सनी यावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “मोमो विकते” असे लिहून पालकांनी नेटकऱ्यांनी दिलेल्या या अफाट प्रेमाबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. सध्या ही ‘क्युट पहाडन’ म्हणून संपूर्ण इंटरनेटवर ट्रेंड करत आहे.
