Video: विमानापेक्षा वेगवान ट्रेनचं उद्घाटन… पाहा चीनच्या Maglev ट्रेनची पहिली झलक

चीनने या ट्रेनचं २१ मीटर लांबीचं प्रोटोटाइप जानेवारी महिन्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर चेंगडू येथे सादर केल्यानंतर सहा महिन्यात या ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं

Video China maglev train 600 kmph
जानेवारीमध्ये याचं प्रोटोटाइप सादर करण्यात आलेलं. (फोटो रॉयटर्स आणि चायना स्टेट मिडियावरुन साभार)

चीनमध्ये जगाच्या तुलनेत वेगवान ट्रेन्सचं जाळं अधिक घट्ट आहे. चीनमधील वेगवान रेल्वेचं जाळं हे जवळजवळ ३७ हजार किलोमीटर लांबीचं आहे. असं असतानाच आता चीनने आणखीन एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवलाय तो म्हणजे विमानापेक्षाही वेगावन ट्रेन सुरु करण्याचा. जगात सर्वात वेगाने धावणारी कमर्शियल ट्रेन शंघाय मगलेव ही ट्रेनही आता चीनच्या वेगवान ट्रेन नेटवर्कमध्ये सहभागी झालीय.. चीनने हाय स्पील मगलेव ट्रेनचा प्रोटोटाइप याच वर्षी जानेवारीमध्ये सादर केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केलाय. या ट्रेनची पहिली झलक नुकतीच चीनने जगाला दाखवली. ही मगलेव ट्रेन तासाला ६०० किमी अंतर पार करु शकते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही ट्रेन बिजिंग वरुन शंघायला विमानापेक्षाही अधिक वेगाने पोहचते.

चीनने या ट्रेनचं २१ मीटर लांबीचं प्रोटोटाइप जानेवारी महिन्यामध्ये प्रसारमाध्यमांसमोर चेंगडू येथे सादर केलं होतं. यूनिव्हर्सिटी रिसर्चर्सने एक १६५ मीटर लांबीचा ट्रॅक बनवून त्यावर या ट्रेनच्या प्रोटोटाइपचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं.  ट्रेनचा लूक आणि ट्रेनमध्ये बसल्यावर कसा अनुभव असेल हे दाखवणारी प्रोटोटाइप ट्रेन तयार करण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांमध्ये ही ट्रेन प्रत्यक्षात धावण्यास सज्ज झालीय. प्रोटोटाइपवर काम करणारे प्राध्यापक चुआन यांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रेनचं संपूर्ण जाळं तीन ते १० वर्षांच्या कालावधीमध्ये कार्यरत होईल असं म्हटलं होतं. तसेच त्यांनी सिचुआनमध्ये काही दुर्मिळ साधनसंपत्ती आहे जीचा वापर या ट्रेनच्या तंत्रज्ञानामध्ये स्थायी स्वरुपाचे चुंबकीय ट्रॅक निर्माण करता येऊ शकतो अशी शक्यताही व्यक्त केलेली.

नक्की पाहा हे फोटो >> आतमधून अशी आलिशान दिसते ही चीनची विमानापेक्षाही वेगाने जाणारी ट्रेन

ट्रेनइतकच भन्नाट तंत्रज्ञान…

चीनने बनवलेली ही मगलेव ट्रेन हाय टेम्परेचर सुपरकंडक्टिंग पॉवरवर चालते. ही ट्रेन चुंबकीय ट्रॅक्सवर तरंगत प्रवास करत असल्यासारखा भास होतो. त्यामुळे या ट्रेनला फ्लोटिंग ट्रेन असंही म्हटलं जातं. मगवेल ट्रेन ही चीनसारख्या मोठ्या आकाराच्या देशामध्ये हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमान प्रवासाला एक चांगला पर्याय ठरु शकते. चीनमध्ये विमानांचा जास्तीत जास्त वेग हा ९०० किमी प्रती तास इतका आहे.

पर्यायी सेवा म्हणून याकडे पाहिलं जात आहे

वेगवान ट्रेन्सचे ट्रॅक आणि मूलभूत सेवा उभारण्यामागे चीनने १५०० किमी लांबीचे अंतर लवकरात लवकर कापता यावे या उद्देशाने पर्यायी सेवा निर्माण करण्याचं काम हाती घेतलं आहे. बीजिंग शंघायदरम्यानचे १२०० किमीचे अंतर कमी वेळेत कापण्याच्या हेतूने चीन आता काम करत आहे. सध्या विमानाने हा प्रवास कऱण्यासाठी साडेचार तासांचा वेळ लागतो तर सध्याच्या ट्रेनने हा वेळ पाच तासांचा आहे. मात्र मगलेव ट्रेन्समुळे हे अंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये कापता येईल.

नक्की वाचा >> भारताची चिंता वाढवणारी बातमी : अरुणाचलपर्यंत पोहचली चीनची बुलेट ट्रेन; वेग १६० किमी प्रती तास

चाचण्या आवश्यक

चीन ज्या पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सेवा निर्माण करत आहे त्या सेवांचा फायदा औद्योगिकरणासाठी करुन घेण्याचा विचार करत आहे. मात्र यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या करणं आवश्यक असून यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. चाचण्या केल्यानंतरच या ट्रेन्सचा व्यवसायिक वापर करता येऊ शकतो. चीनला २०२५ पर्यंत ५०० किमी प्रती तास वेगाने चालणाऱ्या ट्रन्सचा व्यवसायिक दृष्टीकोनातून वापर करायचा आहे.

या ट्रेनची वैशिष्ट्ये काय?

चीनमध्ये ६०० किमी प्रती तास वेगाने धावणाऱ्या हाय स्पीड मगलेव ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर २०१६ पासून सुरु करण्यात आला. हा प्रकल्प चीनच्या विज्ञान आणि प्रद्यौगिक मंत्रालयाच्या अत्याधुनिक रेल्वे प्रकल्पांअंतर्गत राबवण्यात आला. वेग, सुरक्षा, विश्वासार्हता, जास्त प्रवासी क्षमता, वक्तशीरपणा, पर्यावरणपूरक, किमी देखरेखीचा खर्च ही सगळी हाय स्पीड मगलेव ट्रेन्सची वैशिष्ट्ये आहेत. पाहा या ट्रेनची झळक…

,,,म्हणून चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम सुरुय

चीनमधील सर्वात वेगवान ट्रेन असणाऱ्या मगलेव प्रकारच्या ट्रेन्स २००३ पासून चावल्या जात आहेत. या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा ४३१ किमी प्रती तास इतका आहे. ही ट्रेन शांघायमधील पुडोन्ग विमानतळाला शंघायच्या पूर्वेकडील लॉन्गयाग रोडशी जोडते. चीनमध्ये २०२२ पर्यंत जास्तीत जास्त मूलभूत सेवा निर्माण करण्याचं उद्दीष्ट समोर ठेवलं आहे. हिवाळी ऑलिम्पिकचे बीजिंगमध्ये आयोजन करण्यात आलं असल्याने मुख्य शहराला जोडण्यासाठी मूलभूत सेवा उभारण्यासाठी चीन वेगाने काम करत आहे.

विशेष बुलेट ट्रेन्सही केल्या सुरु…

जानेवारी महिन्यामध्ये चीनमध्ये विशेष बुलेट ट्रेन सेवा सुरु करण्यात आली. या ट्रेन कमी तापमान असणाऱ्या प्रदेशातही योग्य पद्धतीने चालू शकतात. सीआर ४०० एएफ-जी नावाच्या या ट्रेन ३५० किमी प्रती तास वेगाने उणे ४० डिग्री तापमानामध्येही चालू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video china unveiled a maglev train capable of a top speed of 600 kmph scsg

ताज्या बातम्या