Video Fisherman Saves And Beats Man Trying Suicide: आईचा धाक काय असतो? असा प्रश्न विचारला तर एक उत्तर नक्कीच ऐकायला मिळेल की, आमच्या आईने मारलं आणि आम्ही रडलो तर आम्हाला परत मार मिळायचा. असं झालं की लहानपणी तुम्हालाही राग आला असेल ना? पण काही वेळा शब्दांचा मार पुरेसा ठरत नाही हे आता मोठं झाल्यावर तुमच्याही लक्षात आलं असेल. आईने दिलेले रट्टे हे आपल्यावरील रागाने नाही तर पुन्हा तीच चूक करू नये म्हणून दिलेले असायचे आणि आता अशीच एक भूमिका मासेमाराने घेतली आहे. आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारलेल्या व्यक्तीला वाचवल्यावर या मासेमाराने त्याला असा काही धडा शिकवला की कदाचित आता पुन्हा तो जीव द्यावा असा विचारही करणार नाही. नेमकं असं घडलं तरी काय हे पाहूया..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एक मच्छीमार एका माणसाला गोमती नदीतून बाहेर काढताना दिसत आहे. त्याला बाहेर घेऊन आल्यावर या मासेमाराने त्याला दोन तीन वेळा चांगल्या सणसणीत कानशिलात लावून दिल्या. शेजारीच इतर मच्छीमार विरुद्ध बाजूने एका महिलेला सुद्धा मदत करत होते. बहुधा या व्यक्तीने व महिलेने एकत्रच जीव देण्यासाठी नदीत उडी मारली असावी.

प्राप्त माहितीनुसार, एकत्र राहणाऱ्या या जोडप्याने गुरुवारी आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारली पण मच्छीमारांनी वेळीच त्यांची सुटका केली. तर पूर्व अहवालानुसार, स्थानिक अधिकारी सध्या या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहेत. मच्छिमारांच्या शौर्यामुळे दोन जीव वाचले त्यासाठी नेटकऱ्यांनी मच्छीमारांचा कौतुक केलं आहेच पण त्याहीपेक्षा नंतर त्या व्यक्तीला शिकवलेला धडा नेटकऱ्यांचे लक्ष जास्त वेधून घेत आहे.

Video: आधी जीव वाचवला आणि मग..

हे ही वाचा<< पुण्याच्या १.६ मिलियन फॉलोअर्स असलेल्या तरुणीचा वादग्रस्त Video पाहून भडकली जनता; मोहोळ, फडणवीसांसह फोटो चर्चेत

दरम्यान, या व्हिडीओखाली वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. “दोघांनी उडी मारली होती ना मग शिक्षा त्या एकट्यालाच का त्या उडी मारणाऱ्या प्रेयसीला सुद्धा चांगला धडा द्या”, अशीही मागणी नेटकरी गमतीत करत आहेत. काहींनी तर “हा नदीत उडी मारल्यावर तर वाचला पण आता कानाखाली खाऊन खाऊन जीव जातो का काय?” असा प्रश्न केला आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक खाड्या, कडे, नद्यांवरून पोलिसांनी सुद्धा जीव द्यायला जाणाऱ्या लोकांना वाचवून मग बेड्या ठोकल्या आहेत. त्यात आता ही नवी शिक्षा चांगलीच चर्चेत आली आहे. गमतीचा भाग सोडल्यास या जोडप्याला खरोखरच समुपदेशनाला पाठवण्याची गरज आहे असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.