scorecardresearch

Video : मुंबईच्या वेशीवर ‘लाल चिखल’; Eastern Express Highway वर पडला २० टन टोमॅटोचा खच

ट्रकमधील टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती रस्त्यावरुन बाजूला काढण्यासाठी जेसीबी क्रेन बोलवावी लागली. या क्रेनच्या मदतीने टोमॅटो बाजूला करण्यात आले

Video : मुंबईच्या वेशीवर ‘लाल चिखल’; Eastern Express Highway वर पडला २० टन टोमॅटोचा खच
चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कोपरी पुलाजवळ पलटी झाला. (फोटो एएनआयवरुन)

तुम्हाला बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील ‘लाल चिखल’ धडा आठवतोय का? शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव न मिळाल्याने त्याने निराश होऊन आपले टोमॅटो बाजारपेठेमध्येच फेकून त्यावर नाचल्याची ही कथा आजही अनेकांच्या आवडत्या धड्यांपैकी एक आहे. मात्र या लाल चिखल धड्याची आठवण करुन देणारी एक घटना आज मुंबईच्या वेशीवर ठाण्यामध्ये घडली.

मुंबई आणि उपनगरामध्ये गुरुवार रात्रीपासूनच मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. शुक्रवारी दिवसभर पाऊस असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसाचा रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. असं असतानाच मुंबईच्या वेशीवर म्हणजेच ठाण्यामध्ये पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने कोपरी टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास एका ट्रकचा अपघात झाला. पूर्व द्रुतगतीमार्गावर एक टोमॅटोचा ट्रक पलटल्याने रस्त्यावर टोमॅटोचा खच पडल्याचं चित्र दिसून आलं. या अपघातामध्ये एकजण जखमी झाल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार २० टन टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कोपरी पुलाजवळ पलटी झाला. या अपघातात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

रात्री झालेल्या या अपघातानंतर ट्रकला दुसरीकडे हलवण्यासाठी त्यामधील २० टन टोमॅटो रस्त्यावर काढण्यात आले. ट्रक पलटी झाल्याने मुंबई आणि नाशिकला जोडणाऱ्या या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ट्रकला तातडीने बाजूला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ट्रकमधील माल रस्त्यावर काढला. ट्रकमधील टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती रस्त्यावरुन बाजूला काढण्यासाठी जेसीबी क्रेन बोलवावी लागली. जेसीबीच्या मदतीने टोमॅटो रस्त्याच्या बाजूला काढून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करुन देण्यात आला.

दरम्यान, नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासूनच वीजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामानखात्याने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मुंबईसहीत उपनगरांमध्ये शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळी वातावरणामुळे मुंबईच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांपर्यंत घट झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या