Patu Thala Poor Family Denied Entry Viral Video: गुरुवारी ३० मार्च रोजी ‘पतू थाला’ हा तमिळ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चेन्नईतील एका कुटुंबासाठी हा चित्रपट अत्यंत दुःखद आठवण देऊन गेला. एका विशिष्ट समाजातील असल्याने एका कुटुंबाला चित्रपटाचं तिकिट विकत घेऊनही थिएटरमध्ये प्रवेश नाकारण्याचा प्रकार सध्या समोर येत आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चेन्नईमधील रोहिणी सिल्वर स्क्रीनबाहेर उभे असलेले हे कुटुंबीय आत प्रवेश देण्याची विनंती करताना या व्हिडीओत दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, चित्रपटाचं तिकिट विकत घेतल्यावरही त्यांना थिएटरमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. ते वारंवार तिकिट दाखवत होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आजूबाजूच्या अन्य प्रेक्षकांनी सुद्धा याबाबत थिएटरच्या मालकाला विनंती केली मात्र तरीही कोणतेही कारण न देता त्या कुटुंबाला प्रवेश देण्यात आला नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच आता रोहिणी थिएटरविरोधात ट्विटरवर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. नेटकऱ्यांचा विरोध पाहता आता थिएटरकडून स्पष्टीकरण जारी करण्यात आले असून त्या कुटुंबामध्ये १२ वर्षांपेक्षा लहान मुलं होती, म्हणून त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला, असं सांगण्यात आले आहे. चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळालं होतं. त्यानुसार १२ वर्षांखालील लहान मुलांना हा चित्रपट पाहण्यासाठी परवानगी नव्हती. या कुटुंबामध्ये २,६,८ आणि १० वयोगटातील मुले होती म्हणूनच या कुटुंबाला प्रवेश दिला गेला नाही अशी अधिकृत भूमिका थिएटरतर्फे मांडण्यात आली आहे. हे ही वाचा<< आई, मी कुरुप आहे तर…चिमुकलीचा प्रश्न ऐकून आईने दिलं सुंदर उत्तर; Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी दरम्यान, थिएटरबाहेर जमलेल्या प्रेक्षकांनी परिस्थितीला पूर्णपणे समजून न घेता वाद निर्माण केला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी आम्ही त्या कुटुंबाला वेळेवर चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश दिला होता”, असंही त्यांनी सांगितलं आहे. याचा पुरावा म्हणून कुटुंब चित्रपट पाह्तानाचा व्हिडीओ सुद्धा थिएटरकडून शेअर करण्यात आला आहे.