जगभरात ‘क्रिकेटचा भगवान’ अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरला रस्त्यावर क्रिकेट खेळताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल. ४ वर्षांपूर्वी २०० वा कसोटी सामना खेळून निवृत्ती घेणारा सचिन मुंबईच्या रस्त्यावर सामान्य मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसेल असा कोणी विचारही केला नसेल. सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या एका रस्त्याच्या कडेला सामान्य मुलांसोबत क्रिकेट खेळताना सचिन दिसत आहे. मुंबईच्या गल्लीमध्ये, रस्त्यांवरच सचिन क्रिकेटची बाराखडी शिकला आणि पुन्हा एकदा सचिन त्याच रुपात पाहायला मिळाला. जगातील सर्वश्रेष्ठ स्टेडियम आणि खेळपट्टीवर सचिन खेळलाय पण या मुलांना रस्त्यावर खेळताना पाहून सचिन स्वतःला रोखू शकला नाही.

रविवारी रात्री मुंबईच्या वांद्रे येथून जाताना सचिनला रस्त्यावर काही मुलं क्रिकेट खेळताना दिसले आणि त्याने आपली गाडी थांबवली. मी यांच्यासोबत दोन-तीन बॉल खेळू शकतो का? हे या मुलांना विचार, असं सचिनने आपल्या सहका-याला सांगितलं. त्यावर सचिनच्या सहका-याने मुलांची परवानगी घेतली आणि गाडीखाली उतरलेला व्यक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

पाहा व्हिडीओ –

[jwplayer RafQbnul]