Viral Video Today: भावंडं म्हंटली भांडणे आलीच. पाणी आणण्यापासून ते फॅनचं बटण चालू- बंद करण्यापर्यंत अगदी कोणत्याही विषयावर भांडण्याची ज्यांची क्षमता असते अशी मंडळी म्हणजे भावंडं. पण एकमेकांमध्ये कितीही वाद असला तरी कोणत्याही बाहेरच्या संकटाला किंवा टीकाकाराला तोंड द्यायचं असेल आणि आपल्या भावंडांची साथ असेल तर काहीच कठीण वाटत नाही. पाण्याच्या ग्लासवरून जीवावर उठणारी भावंडंच संकटातून जीव कसा वाचवतात याचा एक अत्यंत गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या लहानग्या भावाचा जीव वाचवला आहे. या मुलाचे आता नेटिझन्सकडून प्रचंड कौतुक होत आहे,
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक चिमुकला आपल्याच धुंदीत मस्त खेळत आहे.कॅमेरा सुरु करून आपला खेळ रेकॉर्ड करण्याचा त्याचा प्लॅन असावा. इतक्यात त्याचा लहान भाऊ अचानक कॅमेऱ्याच्या समोर येतो. तो काहीतरी खात असताना पटकन त्याचा श्वास गुदमरायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावरून अंदाज येऊ शकतो की खाताना काहीतरी घशात अडकल्याने त्याला श्वास घेता येत नसावा. अशावेळी तो ३ वर्षाचा मोठा दादा चपळाईने आपल्या भावाचा जीव वाचवतो. यासाठी दादाने लावलेली शक्कल आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहूया..
हे ही वाचा<< १० सेकंदात कळेल खरा ‘वाघ’ कोण! वाघ व मोराची थरारक झुंज पाहून एक कोटी लोकांनी घेतला ‘हा’ धडा
दरम्यान, हा व्हिडीओ मुळात टिकटॉक वर पोस्ट करण्यात आला होता. ट्विटरवर पुन्हा शेअर केल्यानंतर या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत या व्हिडिओला २७ लाखाहून अधिक व्ह्यूज तसेच हजारो लाईक्स व कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी कमेंट करून या भावांचे कौतुकही केले आहे.