Cute viral video: परदेशी लोक हिंदी बोलतात हे काही नवीन नाही, पण जर एखादा परदेशी माणूस भारताची प्रादेशिक भाषा बोलत असेल तर? हे पाहून भारतीयांना विशेष आनंद होतो. सध्या अशाच एका व्हिएतनामी तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो तरुण केवळ हिंदीच नाही तर गुजराती भाषेतही बोलत असल्याचे दिसून येते. तो “माजा मा छु” म्हणताच, भारतीय पर्यटक इतके आश्चर्यचकित होतात की त्यांनी त्या क्षणाचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर टाकला आणि तोच व्हिडीओ आता सर्वत्र चर्चेत आला आहे.

हा व्हिडीओ व्हिएतनाममधल्या एका दुकानात शूट करण्यात आला आहे, जिथे काही भारतीय पर्यटक खरेदीसाठी गेले होते. दुकानात काम करणारा व्हिएतनामी मुलगा त्यांच्याशी ओळखीने बोलतो आणि त्यांच्या भाषेची जाण दाखवतो. आधी तो हिंदी बोलतो, मग इंग्रजीत संवाद करतो आणि शेवटी थेट गुजराती बोलून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. भारतीयांनीही गमतीने त्याच्याशी बोलत त्याचे भाषा कौशल्य पाहून आनंद व्यक्त केला.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला भारतीयांचा एक गट त्या तरुणाला विचारतो, “केम छो?” हे ऐकून व्हिएतनामी मुलगा लगेच हसत उत्तर देतो, “मजा मा छु.” हे उत्तर ऐकताच सगळे भारतीय काही सेकंद थक्क होतात आणि एकमेकांकडे बघत हसू लागतात. तिथे सगळे त्याला नमस्कार म्हणायला सांगत होते, पण तो व्हिएतनामी तरुण हसत म्हणाला, ‘नाही, मी काहीतरी वेगळंच बोलेन’, पण त्याने बोललेलं गुजराती वाक्य “मजा मा छु” सगळ्यांना प्रचंड भावते.

त्यानंतर भारतीय पर्यटक त्या दुकानात आणखी बोलत राहतात आणि त्याचे भाषा कौशल्य कौतुकाने पाहतात. हा व्हिडीओ @bearded_daddy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला असून त्यावर कॅप्शन दिले आहे, “आधी हिंदी, नंतर गुजराती… व्हिएतनाममधील या क्षणाने आम्हाला आश्चर्यचकित केले.” या व्हिडीओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. पाहणाऱ्यांनीही या तरुणाचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडिओ

प्रतिक्रियांमध्ये अनेक भारतीयांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणतात की, “आता परदेशातले लोकही आपल्यापेक्षा जास्त भाषा शिकतायत!” तर एकाने म्हटले, “हा मुलगा जर भारतात आला तर सगळ्यांचा लाडका होईल.” तर दुसऱ्याने म्हटले, “हिंदी ठीक आहे, पण गुजराती बोलून दाखवलं ते भारी.”

काही प्रतिक्रियांमध्ये तर लोकांनी लिहिलं की, परदेशी लोकांची भारतीय भाषांबद्दलची आवड खूप आनंद देणारी आहे; तर काही म्हणतात की भारतीय पर्यटक जिथे जिथे जातात, तिथे तिथल्या लोकांना आपल्या भाषेचा प्रभाव होतो. काहींनी हा प्रसंग “खूप क्यूट” आणि “अनपेक्षित” असा म्हटला आहे, तर काहींनी गमतीने लिहिलं “थोड्या दिवसात व्हिएतनाममध्ये मराठीत ‘काय म्हणताय?’ पण ऐकायला मिळेल!”

एक छोटासा संवाद, एक साधा क्षण… पण त्या व्हिएतनामी तरुणाने “मजा मा छु” म्हटल्यावर भारतीयांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला, त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला आहे. भाषा लोकांना जोडते आणि हा व्हिडीओ त्याचच सुंदर उदाहरण ठरतो.