Positive Viral Video : एप्रिल महिन्यातच सूर्य अक्षरश: आग ओकू लागलाय, यामुळे घराबाहेर पडणं सोडा, घरात बसणंही अवघड होतंय. या तीव्र उन्हात तहान लागल्याने आपण फ्रिजमधील थंड पाणी घटाघट पिऊ शकतो, पण त्या मुक्या जनावरांचं काय? ज्यांना कडक उन्हात पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी दारोदार फिरावे लागतेय. याच जनावरांप्रती एका तरुणाने माणुसकी दाखवली, तो आपल्या गावात असे काम करतोय की, त्याचा कामाचा आदर्श प्रत्येक गाव घेऊ शकते.
कडक उन्हात तहानलेल्या जनावरांसाठी तो गावोगावी असे काम करतोय की प्रत्येकजण त्याचे कौतुक करतोय. अजय ठाकूर असे त्या तरुणाचे नाव आहे, त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओच्या सुरुवातीला रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ एक गाय येताना दिसते. पण, हौद पाण्याऐवजी चिखल आणि मातीने भरलेला आहे, जे पाहून तहानलेली गाय निराश होऊन मागे फिरते. यानंतर अजय आणि त्याचे काही मित्र तिथे येतात. ते सर्व मिळून फावडी आणि बादल्यांच्या मदतीने संपूर्ण हौद स्वच्छ करतात.
ते तेवढ्यावरच थांबत नाहीत, पुढे ते लिक्विड आणि ब्रशने हौद घासून स्वच्छ करतात आणि मग रंगवतात, ज्यामुळे हौद अगदी स्वच्छ होतो आणि ज्यात पाणीही स्वच्छ राहते. शेवटी, टँकरच्या मदतीने हौदात स्वच्छ पाणी भरले जाते. भरलेला हौद पाहून गाईदेखील ते पाणी प्यायला येतात. हौदातून पाणी पिणाऱ्या गाईंचे दृश्यही अगदी मनाला भावते.
गेल्या आठ महिन्यांपासून २३ वर्षीय अजय ठाकूर आपला संपूर्ण वेळ मुक्या जीवांच्या सेवेसाठी समर्पित करत आहे. तो सातत्याने अशाच प्रकारच्या पाण्याचे हौद आणि टाक्या बांधतोय, जिथे दररोज शेकडो गाई, कुत्रे, माकडं आणि पक्षी आपली तहान भागवतात.
अजय ठाकूरने त्याच्या (@ajay_thakur_0111_) या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आता अनेकांसाठी आदर्श बनत आहे. व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप प्रेम मिळवत आहे, जो पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, यालाच म्हणतात खरी माणुसकी. दरम्यान, इतर लोकही त्याच्या कामाची प्रशंसा करतायत. काही लोकांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर खोटे डान्स रील्स बनवणाऱ्यांपेक्षा हे तरुण खूपच चांगलं काम करत आहेत; ते खरोखरच समाज आणि निसर्गासाठी काहीतरी करत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे. वाढते सिमेंटचे जंगल आणि नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे आटणे, यामुळे प्राण्यांचा मृत्यू होत आहे. अजय ठाकूर यांचा हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की, आपणही मुक्या प्राण्यांसाठी आपल्या घराच्या छतावर, बाल्कनीत किंवा घराबाहेर मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवले पाहिजे.
