VIP Hoga Apne Ghar Pe Viral Video : व्हीआयपी आणि राजकारण्यांसाठी वाहतुकीचे काही नियम आहेत. जेव्हा ते त्यांच्या अधिकृत वाहनांमधून कामाच्या ठिकाणी किंवा घरी जाण्यासाठी प्रवास करतात, तेव्हा वाहतूक थांबवली जाते. हे नियम त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी असतात. व्हीआयपींच्या प्रवासादरम्यान वाहतूक सिग्नल ग्रीन कॉरिडॉरवर थांबवले जातात. जेव्हा एखाद्या व्हीआयपीचे वाहन रस्त्यावरून जात असते, तेव्हा त्यांच्या वाहनाला जाण्यासाठी मार्ग देण्यासाठी सामान्य वाहतूक थांबवली जाते. पण, याच व्हीआयपी कल्चरमुळे आता सर्वसामान्य लोकांचा संताप अनावर होतोय, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चालक व्हीआयपींसाठी गाडी अडवल्याने संतापला आणि थेट त्याने पोलिसांबरोबर वाद घातला.
या व्हिडीओतून आता लोक व्हीआयपी कल्चरला कशाप्रकारे कंटाळलेत हे दिसतेय. यात एक संतापलेला कारचालक थेट पोलिस अधिकाऱ्यांबरोबरचं वाद घालताना दिसतोय. व्हीआयपींचा ताफा जाणार असल्याने पोलिस अधिकारी गाडीतील चालकाला लेन बदलण्यास सांगताना दिसत आहेत. पोलिसांचे न ऐकता त्या चालकाने दिलेल्या उत्तराने लोकांची मनं जिंकली आहेत. त्या व्यक्तीने पोलिसांना सरळ विचारले, “मी त्या मार्गाने का जाऊ? मी माझा मार्ग का बदलू? हा कसला प्रोटोकॉल आहे?”
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलिस एका कारचालक तरुणाला व्हीआयपींचा ताफा जाणार असल्याचे समजावून सांगत गाडी बाजूच्या लेनमध्ये घेण्यास सांगतात, पण कारचालक स्पष्टपणे उत्तर देतो की, “व्हीआयपींचा ताफा येणार, मग मी काय करू?” यानंतर तो खूप भडकतो आणि म्हणतो की, “ते व्हीआयपी आहे तर काय करू, व्हीआयपी असेल त्यांच्या घरी.” यावरून लोक व्हीआयपी प्रोटोकॉलला किती कंटाळलेत हे दिसून येते.
saini_kanishk27 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, “अखेर कोणीतरी आवाज उठवला.” दुसऱ्याने म्हटले, “फक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाच ही सूट दिली पाहिजे; बाकी सर्वांना वगळले पाहिजे.” आणखी एका युजरने लिहिले की, “गाडी आमची आहे, रस्ता आमचा आहे, मग आम्ही व्हीआयपींना रस्ता का द्यावा?” शेवटी एकाने लिहिले की, “जनतेला त्रास देण्याची आणि व्हीआयपींना रस्ता देण्याची ही प्रथा थांबली पाहिजे.”
