Punch Viral Baby Monkey toy price: सध्या जगभरात चर्चेत आणि ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे इवलसं, लहानगं आणि निरागस दिसणारं पंच माकड. जपानच्या इचीकावा सिटीतील झूओलॉजिकल अँड बोटॅनिकल गार्डनमध्ये या माकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.जपानमधील बेबी मंकीच्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात अनेकांना भावूक केले आहे. जपानच्या इचिकावा शहरातील प्राणी संग्रहालयातील हा व्हिडिओ आहे. २६ जुलै २०२५ रोजी याठिकाणी जन्मलेला एका चिमुकला माकड सध्या जगात ट्रेंडमध्ये आहे. या बेबी मंकीने जन्म घेताच त्याच्या आईने त्याला दूर केले. तेव्हापासून या माकडाचा प्रवास एकटेपणात सुरू झाला. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याचा सांभाळ केला. त्याला खायला प्यायला दिले आणि प्रेमाने त्याचे नाव पंच ठेवले.
पंच कुन नावाच्या बेबी मंकीचा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे न कळत पाणावले आहेत. इन्स्टाग्राम उघडताच या पंचची कहाणी सर्वांचे लक्ष वेधून घेते. एक चिमुकला माकड, ज्याला जन्मताच त्याच्या आईने सोडून दिले. त्याला खेळण्यातील एका बाहुलीने आधार दिला. ज्याप्रकारे बेबी पंच या बाहुलीला मिठी मारून बसतो, ते पाहून अनेक जण भावूक झाल्याचं दिसून येते. बेबी पंचचे अनेक व्हिडिओ, रिल्स शेअर केले जात आहेत. संपूर्ण इंटरनेटवर बेबी पंचसाठी अनेकजण प्रार्थना करत होते.
पंच कुनची एक खास ओळख म्हणजे ऑरंगुटान प्लशी टॉय अर्थात माकडाच्याच एका बाहुल्याशी असणारं त्याचं नातं. जेव्हा पंच या प्राणीसंग्रहालयात आला तेव्हा त्याच्याकडे इतर माकडांनी दुर्लक्ष करत त्याच्यावर ते धावूनही गेले. मात्र हे बाहुलं त्याचा आधार झालं. हे फक्त बाहुलं नसून, त्यामुळं पंचच्या स्नायूंचा विकास होण्यास मदत होत असून, त्याला मातृत्तावाची उणिवही भासत नाहीये.पंच आणि त्याच्यासोबतच्या ऑरंगुटान बाहुल्याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर आश्चर्यकारकरित्या एका बड्या ब्रँडनं काही वर्षांपूर्वीपासूनच विक्रीसाठी ठेवलेल्या या बाहुल्याचा खप एकाएकी वाढला आहे आणि किमंतही.. याची आता किंमत ऐकून तु्म्हीही शॉक व्हाल.
किंमत ऐकून तुम्हीही व्हाल शॉक
या बाहुल्याच्या आता मूळ किमती दहापट जास्त वाढल्या आहेत.न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, जपानमधील इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयातील पंच या सात महिन्यांच्या मॅकाकशी जोडल्यानंतर, $20 (रु. १८१७) किमतीचे आयकेईए डंजेलस्कॉग ऑरंगुटान स्टफड टॉयची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टेक्सासमधील अॅलन येथील एका विक्रेत्याने १७ खेळणी खरेदी केली आणि ती प्रत्येकी $५१.९९ ला सूचीबद्ध केली. एका दिवसात बारा खेळणी विकली गेल्याचे सांगितले जात होते. एका दुकानात, हाच एक बाहुला तब्बल $३५० (रु.३१८०३) पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होता.
