What Happened to This Biker Was Caught on CCTV, VIDEO VIRAL: रस्त्यावर वाहन चालवताना अपघात होण्याची भीती प्रत्येकालाच असते. मात्र, बहुतांश लोकांच्या मनात अपघात म्हणजे दुसऱ्या वाहनाची धडक किंवा चालकाची चूक, एवढाच विचार येतो. पण, कधी कधी संकट कोणत्या दिशेने येईल याचा कोणालाही अंदाज नसतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ हेच वास्तव दाखवतो.

या व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार नेहमीप्रमाणे आपल्या मार्गाने जाताना दिसतो. रस्त्यावर वाहतूकही सुरळीत सुरू असते. सर्व काही अगदी सामान्य वाटत असतानाच काही क्षणांत अशी घटना घडते की, आजूबाजूचे लोकही हादरून जातात.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत अचानक एक मोठी सुकलेली झाडाची फांदी तुटून थेट बाईकस्वाराच्या डोक्यावर कोसळते. तिचा इतका जोरदार धक्का बसतो की त्याचा बाईकवरील ताबा सुटतो आणि तो रस्त्यावर कोसळतो. हे सर्व इतक्या वेगाने घडतं की त्याला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळत नाही.

घटना पाहताच परिसरातील नागरिक धावत त्याच्या मदतीला येतात. सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कोणालाच समजत नाही. काही क्षणांसाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येतं.

रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पुढे त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी त्या बाईकस्वाराने हेल्मेट घातलेलं नव्हतं, त्यामुळे झाडाची फांदी थेट डोक्यावर आदळली आणि गंभीर दुखापत झाली. अनेकांच्या मते, जर त्याने हेल्मेट घातलं असतं तर दुखापतीची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असती.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे, तर अनेकांनी रस्त्यावर हेल्मेट घालण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. वाहन चालवताना धोका फक्त दुसऱ्या वाहनांकडूनच नसतो, तर अशा अनपेक्षित घटनाही जीवावर बेतू शकतात, असंही अनेकांनी नमूद केलं.

दरम्यान, ही घटना बंगळुरूतील राजाजीनगर परिसरातील राम मंदिर रोडवर घडल्याची माहिती समोर आली आहे. जखमी बाईकस्वाराचं नाव सतीश (वय ५२) असून ते नेहमीप्रमाणे कामासाठी जात असताना हा अपघात झाला. या घटनेने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे-हेल्मेट हे केवळ वाहतूक नियम नाही, तर अनपेक्षित संकटाच्या वेळी जीव वाचवू शकणारे महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे.

येथे पाहा व्हिडीओ

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. या व्हिडीओबाबत आम्ही कोणताही स्वतंत्र दावा करत नाही.