सोशल मीडियाचं जग म्हणजे रोज काही ना काही नवं, वेगळं आणि मनाला भिडणारं पाहायला मिळण्याचा अनुभव. कधी एखादा व्हिडीओ आपल्याला हसवतो, कधी भावूक करतो, तर कधी अगदी नकळत आनंद पसरवून जातो. विशेषतः डान्सशी संबंधित व्हिडीओज तर सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. मोठे कलाकार असोत वा लहान मुले, प्रत्येकाचं टॅलेंट या डिजिटल युगात खुलून येतं. अशाच प्रकारे सध्या एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे .
हा व्हिडीओ पाहताना वय, परिस्थिती किंवा ठिकाण यापेक्षा आत्मविश्वास, उत्साह आणि मनमोकळेपणाच जास्त ठळकपणे दिसतो. अनेकदा एखादा साधा क्षणही लोकांच्या आयुष्यात आनंदाचा ठेवा बनून जातो आणि सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओदेखील असाच काहीसा आहे, जो पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आणतो आणि खरंच, ‘टॅलेंटला वयाचं बंधन नसतं’ हे पुन्हा एकदा दाखवून देतो.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहानशी चिमुकली ‘शरारत’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसते. व्हिडीओची सुरुवात एका रस्त्यावर होते, जिथे मोठ्या डीजेवर गाणी सुरू असतात. रस्त्याच्या मधोमध ही मुलगी अगदी बिनधास्त डान्स करताना दिसते आणि आजूबाजूला तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली असते. गाणे सुरू होताच तिचे हात-पाय आपोआप थिरकू लागतात.
तिच्या डान्समधील स्टेप्स, एक्स्प्रेशन्स व एनर्जी पाहून कोणीही थक्क होईल, असे हे दृश्य आहे. इतक्या लहान वयातही ती कोणताही संकोच भावना न ठेवता, पूर्ण आत्मविश्वासाने डान्स करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डान्समधील उत्साह पाहता, ती हा क्षण मनापासून जगत असल्याचे स्पष्ट होते. या व्हिडीओत एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे खरा टॅलेंट कोणत्याही मंचाची वाट पाहत नाही. संधी मिळताच तो स्वतः चमकू शकतो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर pranjalbhaliya या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, अवघ्या काही दिवसांतच त्याला तब्बल १.३ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तसेच, सात लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक करीत आवडल्याचे सांगितले. या व्हिडीओवर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. अनेक युजर्सनी या चिमुकल्या डान्सरचं भरभरून कौतुक केलं आहे. “देव या मुलीला सगळ्यांच्या वाईट नजरेपासून दूर ठेवो,” अशी भावना एका युजरने व्यक्त केली, तर दुसऱ्याने “हा व्हिडीओ अर्धवट सोडताच आला नाही, पूर्ण पाहायला भाग पाडतो,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काही लोकांनी तिच्या आत्मविश्वासाचं खासकरून कौतुक केलं असून, “एवढ्या लहान वयात असा कॉन्फिडन्स क्वचितच पाहायला मिळतो,” असं मत मांडलं आहे. तर काही युजर्सनी “या मुलीमध्ये भविष्यात मोठी डान्सर होण्याची क्षमता आहे,” असंही लिहिलं आहे. या व्हिडीओने लोकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण केल्या असून, आनंद, उत्साह व प्रेरणा देण्याचे काम केले आहे. ही चिमुकली केवळ डान्स करत नाही, तर तिच्या निरागसतेने आणि आत्मविश्वासाने लाखो लोकांची मने जिंकते आहे, असेच म्हणावे लागेल.

