School Boy Viral Video: देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. अनेक शहरांमध्ये दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं देखील अवघड झालयं. तरीही लोकांना काम-धंद्यानिमित्त बाहेर पडावे लागतेच. अशात परिस्थितीत चालताना पुरते हाल होतात. याच कडक उन्हातील एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात घामाने चिंब भिजलेला हा मुलगा निरागसपणे शाळेवर बंदी घालण्याची मागणी करीत आहे. यात चिमुकला पंतप्रधान झालो तर म्हणत, असे काही आवाहन करतोय की तुम्हालाही हसू येईल; पण या व्हिडीओतील मुलाचे दुःखही समजून घेणे गरजेचे आहे.

‘मी पंतप्रधान झालो तर… ‘

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाळेचा गणवेश घातलेला हा मुलगा कॅमेऱ्यासमोर आपली व्यथा व्यक्त करीत म्हणतो, “आम्ही मुलं रोज या ४२-डिग्री कडक उन्हात घामानं भिजून शाळेत जातो. कृपया आमच्यासारख्या मुलांवर थोडी दया करा, नाही तर आम्ही आजारी पडू.”

व्हिडीओमधील सर्वांत मजेशीर भाग म्हणजे तो मुलगा भविष्यात आपण पंतप्रधान झालो तर… अशी स्वप्ने पाहतोय. तो म्हणतो, “जेव्हा मी पंतप्रधान होईन, तेव्हा मी उन्हाळ्यात शाळेत जाण्यावर पूर्णपणे बंदी घालीन.”

उन्हात शाळेत जाणे खरोखरच खूप अवघड

सोशल मीडियावर चिमुकल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच लोक त्याच्या निरागसतेने प्रभावित झाले आहेत. नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “माझे मत या छोट्या नेत्याला जाईल.”

दरम्यान, या व्हिडीओवर आता अनेक पालकही व्यक्त होत आहेत. अनेकांनी असे मत व्यक्त केले की, खरोखरच लहान मुलांना कडक उन्हात शाळेत पाठवणे हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. अनेकांनी याला बालपणाची सर्वांत खरी आणि प्रामाणिक मागणी, असे म्हटले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे शाळेच्या वेळा आणि कडक उन्हामुळे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.