Street Vendor Funny Song Video : दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराघरांत महिलांसमोर असणारा सगळ्यात मोठा आणि डोकेदुखीचा प्रश्न म्हणजे “आज भाजी काय करायची? घरातल्यांच्या आवडीनिवडीनुसार रोज भाजी कोणती बनवायची या प्रश्नाने गृहिणी हैराण होतात. महिलांच्या मनातील हाच प्रश्न ओळखून एका कडधान्य विकणाऱ्या काकांनी एक जबरदस्त गाणं बनवलयं, जे ऐकून तुम्हाला हसू आवरणं अवघड होईल. या काकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कडधान्य विक्रेत्या काका रोज सायकलवरून गावोगावी फिरून मोड आलेली मटकी आणि इतक कडधान्य विकतात. यावेळी महिलांना साद घालत त्यांनी आपली मटकी विकण्याचा अनोखा फंडा शोधून काढला आहे. कडधान्य विकताना काकांनी गायलेले हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होतय, जे आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

काकांचं गाणं नेमकं कसं आहे?

सायकलची घंटी वाजवत गावोगावी फिरताना हे काका मोठ्या तालासुरात गातात….

“सकाळी पाहिलं तर भाजीची कटकट,
संध्याकाळी पाहिलं तर तीच कटकट…
आता नाय काय जी,
मटकी घ्या ना ओ बायजी, मस्त करा भाजी!”

काकांचे हे साधे, सोपे आणि लोकसंस्कृतीचा बाज असणारे गाणे ऐकून रस्त्यावरून जाणारे-येणारे लोक आणि गृहिणी केवळ आकर्षितच होत नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक हसूही उमटते. महिलांच्या रोजच्या भाजीच्या डोकेदुखीवर त्यांनी ‘मोड आलेली मटकी’ हा सोपा आणि पौष्टिक पर्याय गाण्यातून सुचवला आहे. त्यांचं हे जबरदस्त गाणं थेट लोकांच्या हृदयाला भिडत आहे.

मटकी विकणाऱ्या काकांचा जबरदस्त व्हिडीओ

आजकाल सोशल मीडियावर युनिक मार्केटिंग आणि गाणी गाऊन वस्तू विकणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, या काकांच्या गाण्यातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे. balu_kaka_matki_wale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स “काकांनी तर थेट गृहिणींच्या मनातली खंत ओळखली!” अशा कमेंट्स करत आहेत; तर काहींनी विकण्याची ही खूप चांगली कला जमली आहे अशा कमेंट्स केल्या आहेत, तर एकीने सुंदर विक्री आणि करमणूक अशी कमेंट केली आहे.