Viral Monkey Attack Video: सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. सुरुवातीला साधा वाटणारा हा प्रसंग काही सेकंदांतच इतका धक्कादायक वळण घेतो की, पाहणाऱ्यांनाही क्षणभर काय झालं ते समजत नाही. एक आजी आणि एका माकडामधील ही झटापट आता इंटरनेटवर वादाचा विषय ठरली आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तब्बल १२८ दशलक्षापेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या या क्लिपमध्ये सुरुवातीला सगळं शांत दिसतं. एक माकड स्कूटीजवळ अगदी निवांत बसलेलं असतं. आसपासचे लोकही आपल्या कामात व्यग्र असतात. पण, अचानक काहीतरी घडतं… आणि सगळं बदलून जातं!

व्हिडीओत दिसतं की, एक आजी त्या ठिकाणी येतात आणि कोणतीही पूर्वसूचना न देता, अचानक एक मोठा दगड उचलतात. पुढच्या क्षणी त्या तो दगड थेट त्या शांत बसलेल्या माकडावर फेकतात. हा अनपेक्षित हल्ला झाल्यावर स्वाभाविकपणे माकड काही क्षण गोंधळून मागे सरकते खरे; पण तो दगड त्याच्या अगदी जवळून गेला हे पाहून, त्याचा जीव धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलते…

क्षणातच ते माकड आक्रमक होतं आणि थेट आजींवर झेप घेतं!

त्या ठिकाणी उभ्या असलेल्या काही लोकांच्या मदतीने आजी एका क्षणी स्वतःला सावरतात. पण, इथेच कथा संपत नाही… उलट पुढे जे घडतं, ते अधिक धक्कादायक आहे. जवळच असलेली एक महिला हातात काठी घेऊन येते. त्या वेळी परिस्थिती नियंत्रणात येईल, असं वाटत असतानाच आजी अचानक तिच्या हातातून काठी हिसकावून घेतात… आणि पुन्हा त्या माकडाकडे धाव घेतात.

ते पाहताच माकड पुन्हा चिडतं आणि यावेळी ते अधिक आक्रमकपणे प्रतिकार करतं. पुन्हा एकदा आजींवर झेप घेतल्यामुळे तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण होतं. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचं वातावरण पसरतं.

हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “इथे खरा प्राणी कोण,” असा प्रश्न अनेक जण विचारताना दिसत आहेत. काहींनी आजींच्या वर्तनावर तीव्र टीका केली आहे; तर काहींनी माकडानं केवळ स्वतःचा बचाव केल्याचं मत व्यक्त केलं आहे.

एका युजरने लिहिले, “फक्त वयस्कर असल्यामुळे आदर मिळत नाही, वागणंही तितकंच महत्त्वाचं असतं.” तर दुसऱ्याने टोमणा मारत म्हटले, “हा व्हिडीओ पाहून ठरवा, इथे ‘खरा प्राणी कोण‘ आहे” आणखी एका व्यक्तीने लिहिले, “विनाकारण एखाद्या प्राण्याला त्रास दिलात, तर तो स्वतःचा बचाव करण्यासाठी हल्ला करणारच.”

या व्हिडीओला लाखो लाइक्स आणि हजारो कमेंट्स मिळाले असून, सोशल मीडियावर ‘माणुसकी विरुद्ध प्राणी’ अशा चर्चेने वेग घेतला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

(डिस्क्लेमर : ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. त्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.)