Man or Animal Illusion: सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही फोटो त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत येतात, तर काही असे असतात जे पाहणाऱ्यांच्या डोक्यालाच अक्षरशः चालना देतात. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर हजारो लोक गोंधळून गेले असून, त्यात नेमकं काय आहे हे ओळखताना अनेकांची फसगत होत आहे.
पहिल्या नजरेत हा फोटो अगदी साधा वाटतो. बर्फाने झाकलेल्या परिसरात झाडे आणि विरळ झुडपे दिसतात. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेला एक माणूस धावत असल्याचे अनेकांना जाणवते. फोटो पाहणाऱ्या बहुतांश लोकांना सुरुवातीला हाच भास होतो, त्यामुळे अनेकजण क्षणाचाही विचार न करता ती धावणारी व्यक्ती असल्याचे मानतात.
मात्र खरी गंमत इथूनच सुरू होते.
जर तुम्ही हा फोटो थोडा वेळ बारकाईने पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, ज्या आकृतीला तुम्ही माणूस समजत होतात, ती प्रत्यक्षात माणूसच नाही. फोटोमध्ये दिसणारी ती काळी आकृती एका प्राण्याची आहे. अनेकांच्या मते ते अस्वल असू शकते, तर काहींना तो दाट केस असलेला कुत्रा असल्याचा भास होतो. पण एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे फोटोमध्ये धावणारा कोणताही माणूस नाही.
याच कारणामुळे हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. प्रसिद्ध पत्रकार निकोलस थॉम्पसन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटोसोबत त्यांनी एक छोटीशी टिप्पणीही लिहिली होती. त्यांनी म्हटले की, ‘सुरुवातीला तुम्हाला बर्फात धावणारा एक माणूस दिसेल… आणि मग…’
हीच ओळ पाहिल्यानंतर अनेकांनी फोटो पुन्हा पुन्हा पाहण्यास सुरुवात केली. जसजसे लोक फोटो नीट पाहू लागले, तसतसे त्यांना त्यामागील रहस्य उलगडू लागले. अनेकांना सुरुवातीला स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नव्हता.
हा फोटो इंटरनेटवर अक्षरशः वादळासारखा पसरला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला, तर हजारो जणांनी तो शेअर केला. कमेंट सेक्शनमध्येही मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी स्पष्टपणे सांगितले की त्यांना सुरुवातीपासूनच तो माणूस वाटला नाही, तर काहींनी गमतीने विचारले की, ज्यांना तो धावणारा माणूस दिसला, त्यांनी त्याच्या शरीराला जोडलेले प्राण्याचे मोठे डोके कसे दुर्लक्षित केले?
ऑप्टिकल इल्यूजनचे हेच वैशिष्ट्य असते. आपला मेंदू आणि डोळे कधी-कधी समोर दिसणाऱ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावतात. आपण जे पाहतो तेच सत्य आहे असे वाटते, पण प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच असते; त्यामुळे अशा प्रकारचे फोटो लोकांना केवळ मनोरंजनच देत नाहीत, तर त्यांच्या निरीक्षणशक्तीचीही परीक्षा घेतात.
मग तुम्ही हा फोटो पाहिलात तर पहिल्या नजरेत तुम्हाला माणूस दिसेल की प्राणी? उत्तर देण्यापूर्वी एकदा नीट पाहा… कारण या फोटोचे रहस्य पहिल्या प्रयत्नात उलगडेलच असे नाही!
