Venezuela Earthquake Viral Photo: ‘पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा’… हे वाक्य अनेकांनी ऐकलं असेल. देव कोणत्या रूपात मदतीला धावून येईल हे कोणीच सांगू शकत नाही, अशी भावना या ओळींमधून व्यक्त केली जाते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्राने पुन्हा एकदा याच वाक्याची आठवण करून दिली आहे. ढिगाऱ्याखालील एका हृदयस्पर्शी दृश्यामुळे लाखो लोक भावूक झाले असून हा फोटो जगभर चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल पोस्टनुसार, एका भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर बचाव पथक घटनास्थळी शोधमोहीम राबवत होते. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यात जिवंत व्यक्तींचा शोध सुरू असताना त्यांना असे काही दिसले की, काही क्षणांसाठी सर्वजण स्तब्ध झाले. त्या दृश्याकडे पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले.

ढिगाऱ्याखाली एक लहान मूल अडकलेले होते. मात्र, त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्या मुलाच्या अंगावर एक श्वान संरक्षण कवचासारखा बसलेला दिसत होता. जणू त्या निष्पाप जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली होती. सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी हे दृश्य देवाच्या कृपेची अनुभूती असल्याची भावना व्यक्त केली.

कुत्रा हा माणसाचा सर्वात विश्वासू साथीदार मानला जातो. अनेक प्रसंगी त्याने आपल्या मालकासाठी जीव धोक्यात घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या छायाचित्राने लोकांना आणखी भावूक केले. व्हायरल दाव्यानुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्या मुलाजवळ हा श्वान बराच वेळ शांतपणे बसून राहिला. तो ना भुंकत होता, ना घाबरून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यांतील भीती आणि मायेची भावना अनेकांच्या मनाला भिडली.

बचाव पथकाने मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हाही कुत्रा लगेच दूर झाला नाही, असा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. प्रथम त्याचा विश्वास संपादन करण्यात आला. बचावकर्ते मुलाला सुरक्षित बाहेर काढतील, याची खात्री झाल्यानंतरच तो त्या मुलापासून दूर सरकला, असेही सांगितले जात आहे.

त्यानंतर बचाव पथकाने मुलाला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. व्हायरल पोस्टनुसार, मूल जिवंत असल्याचे पाहताच घटनास्थळी उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. एका प्राण्याने दाखवलेली निष्ठा, माया आणि जिवापाड जपण्याची भावना पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. काहींनी त्या श्वानासाठी टाळ्यांचा कडकडाट करून त्याचा सन्मान केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेक जण ‘पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाऐंगे’ असे लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, या छायाचित्रासोबत करण्यात आलेल्या सर्व दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे या कथेकडे व्हायरल सोशल मीडिया पोस्ट म्हणूनच पाहणे योग्य ठरेल.

येथे पाहा फोटो

व्हायरल पोस्टनुसार, ही घटना व्हेनेझुएला येथे झालेल्या विनाशकारी भूकंपानंतरची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, संबंधित छायाचित्र आणि त्यामागील कथेबाबत अधिकृत संस्थांकडून स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.