Delhi Woman Viral Post : चिमुकली, तरुणी असो किंवा महिला यांचं आयुष्य खडतर आहेच. अगदी ओळखीचा माणूस असो किंवा परका त्याची नजर चांगली नसली, तर तिचा जीव घाबरून जातो. तो ओळखीचा असेल, तर चारचौघांसमोर ती त्याच्याबाबत बोलू शकत नाही आणि परका असेल, तर ती घाबरल्याने कधी कधी एकटी त्याचा सामना करू शकत नाही. मग पटत नसतानाही एकटीनं न फिरण्याची, एकटीनं न राहण्याची, रात्री उशिरा न येण्याची बंधनं स्वतःवर लादून घ्यावी लागतात. अशीच परिस्थिती आज एका तरुणींसमोर उभी राहिली; जेव्हा तिला मध्यरात्री आइस्क्रीम खाण्याची इच्छा झाली.
एका तरुणीला मध्यरात्री आइस्क्रीम खाण्याची प्रचंड इच्छा झाली. त्यामुळे तिनं ‘ब्लिंकिट’वरून आइस्क्रीम मागवलं. त्यानंतर ऑर्डर देण्यासाठी डिलिव्हरी बॉय आला. तरुणीनं ऑर्डर घेण्यासाठी तिच्या बहिणीला पाठवलं. पण, ऑर्डर घ्यायला गेलेल्या बहिणीनं जे सांगितलं, ते ऐकून तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली.
तरुणीची बहीण दारामागे वाट पाहत आहे हे पाहूनसुद्धा डिलिव्हरी बॉय इकडे-तिकडे बघत होता, बिल्डिंगचा संपूर्ण मजला फिरताना पाहून तरुणीच्या बहिणीनं “दादा, माझीच ऑर्डर आहे ती, तुम्ही इकडे-तिकडे काय फिरताय”, (भैया मेरा ही ऑर्डर है, आप उधर क्यूं जा रहे हो) असे हिंदीमध्ये म्हटले. त्यावर डिलिव्हरी बॉयनं काहीच प्रतिसाद दिला नाही आणि आजूबाजूला बघत राहिला. मग तो तरुणीच्या दाराजवळ आला. त्यानं तरुणीच्या बहिणीला अगदी खालपासून वरपर्यंत नजरेनं तपासलं. त्याचे वेध घेणारे डोळे अगदी लाल दिसत होते. ते सगळं पाहून ती घाबरली आणि तिनं लगेच बहिणीला फोन केला.
पोस्ट नक्की बघा…
त्यावेळी ती तरुणी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर कॉलवर बोलत होती. पण, बहिणीचा फोन येताच तरुणी नक्की काय झालं काय हे पाहण्यासाठी तिच्याजवळ गेली. डिलिव्हरी बॉयला पाहता क्षणी तरुणीदेखील बहिणीइतकीच घाबरली. त्याचे डोळे कसे दिसत होते हे समजावून कसे सांगावे हे तिलादेखील कळत नव्हते. पण, तो वेडा वाटत होता. कारण- तो बोलला नाही किंवा त्यानं डोळे मिचकावले नाहीत. फक्त त्याचे डोळे उघडे होते आणि ते लाल दिसत होते. तो तरुणीकडे अशा प्रकारे पाहत होता की, जणू काय तो तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं करणार आहे.
तरुणीनं घाबरून त्याला ऑर्डर जमिनीवर ठेवण्यास सांगितलं. तो ऑर्डर दारात ठेवून निघाला. पण, जाताना एक नजर त्याची तरुणीकडे होती. तो लिफ्टमध्ये चढताच तरुणीनं लगेच ऑर्डर उचलली. त्यानं तरुणीच्या दाराकडे नीट पाहिलं. हे सगळं खूपच भयानक होतं आणि तरुणीची गट फिलिंग (आतून काहीतरी जाणवणं) सांगत होती की, त्याचा हेतू चांगला नव्हता. त्याच्या डोळ्यांत भयानक भाव होते. तरुणी एकटी आहे का हे पाहण्यासाठी तो सतत दाराकडे पाहत होता. त्यानंतर तरुणीनं तिच्या वडिलांना ‘आइस्क्रीम आलं आहे’, असं सांगायला फोन केला, जेणेकरून तरुणी एकटी नाही आहे हे त्या डिलिव्हरी बॉयला कळावं.
हा भयावह प्रसंग सांगत तरुणीनं एकट्या राहणाऱ्या सगळ्याच तरुणी आणि महिलांना सुरक्षित राहा आणि रात्री उशिरा एखादी ऑर्डर करणं टाळा. परिस्थिती कधी बदलू शकते हे तुम्हाला कधीच कळणारसुद्धा नाही, असं आवर्जून पोस्टमध्ये सांगितलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @reddit वरून शेअर करण्यात आली आहे.