Viral Photo Shows Father Shared Heartfelt Post For Son : आई-बाबाचे आपल्या जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी मुलं रांगत येण्यापासून ते लग्न करून मुलं-बाळं सांभाळण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी पाहिलेला असतो. मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या आई-बाबांच्या मनात त्यांच्या मुलांनी मोठं होऊन काहीतरी अभिमानास्पद करावे, अशी इच्छा त्यांची असते. तर आज असेच एका वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बाबांचा मुलगा पहिल्यांदा कॅप्टन होऊन इंडिगो विमान चालवतोय. तर हा खास दिवस बाबांनी त्यांच्या शब्दांत कॅप्शनमध्ये मांडला आहे.
लेकाबरोबर काही फोटोज शेअर करीत या बाबांनी लिहिलेय, “विमानात उजव्या सीटवरून डाव्या सीटवर बसणारा अचानक सीनियर फर्स्ट ऑफिसर (SFO) कॅप्टन बनतो. एक कॅप्टन सह-वैमानिक व क्रू सदस्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच आणि प्रवाशांचा विश्वास जपण्याव्यतिरिक्त महत्त्वाचे निर्णय घेतो. ३० हजार फुटांपेक्षा अधिक फूट उंचीवर एक कॅप्टन त्याच्या फ्लाइटमधील प्रत्येकासाठी पालकांसारखा वागतो. एक कॅप्टन विमानाचा पायलट इन कमांड (PIC) असतो. त्यामुळे कोणत्याही पायलटसाठी हा एक मोठा क्षण असतो; पण त्याहून जास्त पायलटच्या पालकांसाठी तो खूप मोठा क्षण असतो”.
एक वेगळाच अनुभव होता (Viral Photo)
तर हा खास क्षण अनुभवण्यासाठी कॅप्टन अतुलचे आई-वडील गुरुवारी चंदिगडहून बंगळुरूला गेले आणि त्या फ्लाइटसाठी त्यांनी तिकीट बुक केली. फ्लाइटमध्ये चढणे आणि ३० हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर उड्डाण करणे हा कॅप्टनच्या पालकांसाठी एक वेगळाच अनुभव होता. बंगळुरू येथे सुरळीत लँडिंग केल्यानंतर कॅप्टनच्या पालकांना त्यांच्या मुलाच्या कॅप्टनच्या गणवेशावरील खांद्यावर असणाऱ्या अॅपीलेट तीन पट्ट्यांवरून चार पट्ट्यांमध्ये बदलण्याचे सौभाग्य मिळाले. कॅप्टनच्या भूमिकेसाठी अतिरिक्त अपेक्षा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कॅप्टन अतुल यांच्या पालकांना विश्वास आहे की, कॅप्टन अतुल चौधरी त्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडतील आणि प्रवाशांचा विश्वास जिंकतील.
पोस्ट बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तसेच आपल्या लेकाबरोबर हा खास क्षण अनुभवता आला यासाठी अतुलच्या पालकांनी इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड), फ्लाइट स्कूलचे, गोंदिया येथील त्यांचे प्रशिक्षक आणि माद्रिद येथील सीएई सुविधा पुरवणाऱ्यांसह प्रशिक्षकांचे आभार मानले. या प्रवासात आमच्या मुलाला योगदान देणाऱ्या, आशीर्वाद देणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, अशी कॅप्शन देऊन त्यांनी पोस्टचा शेवट केला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @Anil Kant Choudhary या @linkedin अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.