Viral Photo Of Swiggy Delivery Boy : मला जॉब भेटतच नाही आहे, मला काम जमतच नाही आहे, इथे पगार कमी आहे, मी हा जॉब करणार नाही, अशी कारणे सांगून नोकरीला नाही म्हणणारी बरीच मंडळी असतात. पण, अनेकदा कुटुंब, परिस्थिती व भविष्य यांचा विचार करून समोर येणारी कोणतीही नोकरी स्वीकारणारे फार कमी लोक असतात. अशीच एक अनोखी व डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
LocalKing.in चे संस्थापक व सीईओ मयंक अग्रवाल यांनी सोशल मीडियावर एका डिलिव्हरी बॉयची गोष्ट सांगितली आहे. त्यांनी पार्सल मागवले होते आणि पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय त्यांच्या बिल्डिंगखाली आला. “मी पोहोचलो आहे”, असे सांगत स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयचा फोन आला. मग मयंक अग्रवाल यांनी त्याला दुसऱ्या मजल्यावर यायला सांगितले. पण, फोन ठेवण्यापूर्वीच मयंक यांना एका लहान मुलाचा आवाज ऐकू आला. मग आश्चर्याने मयंक यांनी “तुमच्याबरोबर लहान मूल आहे का” असे विचारले. कोणताही वेळ वाया न घालवता त्यांनी लगेच “हो” असे उत्तर दिले. मग हे ऐकताच मयंक यांनी “थांबा, मी खाली येतो” असे म्हटले.
जेव्हा मयंक खाली उतरले तेव्हा डिलिव्हरी बॉयच्या बाईकवर जेमतेम दोन वर्षांची लहान मुलगी होती. मयंकने त्यांना विचारले, “ही चिमुकली तुमच्याबरोबर काय करते आहे”. त्यावर डिलिव्हरी बॉयने, “बाळंतपणात तिची आई वारली. त्यातच घरी कोणीच नाही. मोठा भाऊ संध्याकाळी क्लासला जातो आणि तो परत येईपर्यंत मला तिची काळजी घ्यावी लागेल. तिचे नाव तुन तुन (Tun Tun)आहे”, असे सांगितले.
तर डिलिव्हरी बॉय पंकज त्यांच्या चिमुकलीला घेऊन त्यांचे काम सांभाळतात. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. काही ग्राहकांना त्यांनी स्वतःची समस्या सांगितल्यावर “जर तुम्ही हे करू शकत नसाल, तर घरी बसा. लहान मूल असणं ही तुमची समस्या आहे”, असे सहज म्हणून जायचे. म्हणजे त्यामुळे प्रश्न पडतो की, समाज म्हणून आपण नक्की काय करीत आहोत. पण, डिलिव्हरी बॉय पंकज याबद्दल कोणतीच तक्रार करीत नव्हते. फक्त चेहऱ्यावर स्मित ठेवून काम करीत होते.
पोस्ट नक्की बघा…

हे सगळे बघून मयंक यांनी डिलिव्हरी बॉय पंकज आणि चिमुकली तुन तुनचा फोटो काढून linkedin अकाऊंटवरून @Mayank Agarwal यांची संपूर्ण गोष्ट लिहून पोस्ट केली आणि “आपण किती गोष्टींना गृहीत धरतो आणि किती जण दररोज शांतपणे अशा प्रकारचे ओझे वाहून काम करीत असतात. पण, पंकज आणि तुन तुन खरोखरच प्रेरणादायी आहेत. फोटो बघून मुलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणीही चिंता व्यक्त करण्यापूर्वी, कृपया समजून घ्या पंकज आवडीनुसार नाही, तर जबरदस्तीने हे काम करीत आहेत. कृपया सहानुभूती दाखवा. तसेच स्विगी टीममधील कोणीतरी हे लक्षात घ्यावे आणि त्याला पाठिंबा देण्याचा मार्ग शोधावा. मी माझ्या क्षमतेनुसार जे काही करू शकलो, ते मी केले. त्याचे सौम्य हास्य आणि त्याच्या मुलीचा निरागस चेहरा मला नेहमीच आठवत राहील. तुमच्यापैकी ज्यांना त्याला आर्थिक मदत करायची आहे, ज्यांना त्याचा फोन नंबर हवा आहे, त्यांनी कृपया मला DM करा. मी त्याच्या परवानगीने त्याचा फोटो आणि त्यांची गोष्ट येथे पोस्ट करीत आहे” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.