उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्विटर पोस्ट अनेकदा सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतात. ते त्यांच्या फॉलोअर्ससोबत मजेदार वन-लाइनर आणि जीवनातील महत्त्वाचे धडे शेअर करत असतात. पण सोमवारी, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एका युजरला उत्तर दिल्याची पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या युजरने त्यांना त्यांच्या पात्रतेबद्दल विचारले होते.

आनंद महिंद्रा यांनी सोमवारी, एका डोंगराळ भागात बसून पुस्तकात तल्लीन होऊन अभ्यास करणाऱ्या मुलीच्या चित्रावर भाष्य केले. ट्विटर युजर अभिषेक दुबे याने एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, ‘आज मी हिमाचलच्या स्टॉन भागात सहलीला गेलो होतो, त्यावेळी या चिमुरडीला एकटी बसून नोट्स लिहिताना पाहून मला आश्चर्य वाटले, पुस्तकांमध्ये तिची एकाग्रता पाहून मला किती आश्चर्य वाटले ते मी व्यक्त करू शकत नाही. खूप छान’

अभिमानास्पद! मुलाची बारावीची गुणपत्रिका प्रवाशांसोबत शेअर करताना रिक्षाचालक बापाचा आनंद गगनात मावेना

उद्योगपती आनंद महिंद्रा मुलीच्या समर्पणाने प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘सुंदर चित्र, अभिषेक. हे माझे #MondayMotivation आहे.’ त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. लोकांनाही हा फोटो प्रेरणादायी वाटला. पण एका यूजरने महिंद्र यांना प्रश्न विचारला.

वैभव एसडी नावाच्या युजरने आनंद महिंद्राला विचारले की ‘सर, मला तुमची पात्रता कळू शकते का?’ यावर ६७ वर्षीय आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकले आहे. ते म्हणाले, ‘खरे सांगायचे तर, माझ्या वयात, कोणत्याही गुणवत्तेची एकमेव पात्रता म्हणजे अनुभव…’

शेअर केल्यापासून, महिंद्रा यांच्या पोस्टला ५६०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि ३०० पेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘अनुभव हा कोणत्याही डिग्रीपेक्षा मोठा असतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘अनुभव अमूल्य आहे! डिग्रीसारखे नाही जी आजकाल एक वस्तू बनलेली आहे!’