Viral video: आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. या महिलेनंही असंच केलं. तिनं आपल्या पोटच्या मुलाला खोल विहिरीत लटकवलं आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विहिरीच्या कडांवर बसून एक महिला आपल्या लहान मुलाचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. यावेळी कोणत्याही संभाव्य धोक्याचा विचार न करता ती निष्काळजीपणे मुलाला धरून ठेवताना आणि कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला रील करण्यामध्ये गुंतलेली असताना मुलाने तिचा पाय घट्ट पकडला होता. विहिरीच्या कडेला बसून तिनं मुलाच्या एका हाताला पकडून त्याला विहिरीत लटकवून ठेवलं आहे. मुलगाही प्रचंड घाबरलेला दिसत असून त्यानं आईला घट्ट पकडून ठेवलं आहे. पोटच्या मुलांसाठी आई-वडील वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण, या व्हिडीओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अशाप्रकारे मृत्यूच्या दारात घेऊन गेली आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/RawAndRealMan/status/1836284504031351123

हेही वाचा >> “वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO

व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी महिलेवर टीका केली आहे. मुलाच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करण्याऐवजी काही सेकंदांच्या लहान रीलला जास्त महत्त्व देणाऱ्या महिलेवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. “आजच्या जगात आई होण्यापेक्षा इंटरनेटवर प्रसिद्धी अधिक महत्त्वाची आहे”, “अगं आई ना तू? हे पाहून खूप दुःख झालं”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.